MLA Anil Babar passed away: सर्वसामान्य जनता अन् कार्यकर्त्याच्या हक्काचे भाऊ गेले

By हणमंत पाटील | Published: February 1, 2024 01:33 PM2024-02-01T13:33:11+5:302024-02-01T13:33:22+5:30

..त्यामुळे भाऊंच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अथवा टाळाटाळ करण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिम्मत होत नव्हती.

MLA Anil Babar was close to common people and activists | MLA Anil Babar passed away: सर्वसामान्य जनता अन् कार्यकर्त्याच्या हक्काचे भाऊ गेले

MLA Anil Babar passed away: सर्वसामान्य जनता अन् कार्यकर्त्याच्या हक्काचे भाऊ गेले

हणमंत पाटील

सांगली : पहिल्याच रिंगमध्ये मोबाईल उचलल्याने, कॉल करणाराच गडबडतो. भाऊ आहेत का ? हो बोला भाऊच बोलतोय. समोरच्याचे काम समजून घेऊन थोड्या वेळाने सांगतो म्हणायचे. मग, कॉल करणारा कोण आहे, आपल्या पार्टीचा आहे की विरोधक आहे, याविषयी विचारणा करीत नसत. माझे आताच बोलणे झाले आहे, तुम्ही त्या अधिकाऱ्याला भेटा म्हणून पुन्हा आवर्जून कॉल करून सांगत असत. मग कॉल करणारा विरोधी पार्टीचा असेल, तर तो ओशाळून जायचा. पुढे तो हमखास भाऊचा कार्यकर्ता व्हायचा.

कार्यकर्त्याला कधीही अडचण येऊ दे, मध्यरात्री भाऊ कॉल घेणारच याची खात्री असायची. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असो की कार्यकर्ता त्यांना भाऊ हक्काचे वाटायचे. कामाच्या निमित्ताने एखादा माणूस भाऊंच्या संपर्कात आला की पुढे तो त्याचा एक तर हक्काचा मतदार अथवा कार्यकर्ता होतो. त्यामुळे आतापर्यंत भाऊंना सोडून कोणताही कार्यकर्ता दुसऱ्या पार्टीत गेला नाही. अपवादाने एखादा गेलाच तर त्याला पुढे पश्चाताप व्हायचा.

कोरोना काळातही भाऊ कधीही घरी बसले नाहीत. कारण कार्यकर्तेच काय, मतदार संघाबाहेरील त्यांचे नातेवाईकही हक्काने भाऊंना कॉल करायचे. आम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नाहीत. रेमडेसिव्हरचे इंजेक्शन मिळत नाही. हा नानाचा पाडा थांबवून भाऊ म्हणायचे सांगतो. मग काय थोड्या वेळात संबंधित हॉस्पिटलमधून कॉल यायचा. तुम्ही भाऊंना कॉल केला होता का, तुमच्यासाठी बेडची व्यवस्था केली आहे. इतका वचक प्रशासनावर कायम राहिला.

ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत अधिकारी वरिष्ठ असो की कनिष्ठ. भाऊचा कॉल आला की अधिकारी सतर्क व्ह्ययचे. कारण जनतेच्या कामाशिवाय भाऊ कधीही कॉल करणार नाहीत, याची त्यांना खात्री असायची. शिवाय भाऊ केवळ कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी तोंडदेखले कॉल करीत नाहीत. काम मार्गी लागेपर्यंत ते पाठपुरावा करतात, हे त्यांना माहिती असते. त्यामुळे भाऊंच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अथवा टाळाटाळ करण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिम्मत होत नव्हती.

एखादा अधिकारी नवीन असेल, तर त्याला बाजूचे कर्मचारी सतर्क करायचे. भाऊंचे काम असेल, तर ते करावेच लागेल, अन्यथा काही खरे नाही. इतका प्रशासनावर भाऊंचा वचक शेवटपर्यंत राहिला. त्यामुळे भाऊंकडे गेलेल्या कार्यकर्त्यांचे काम हमखास व्ह्यायचेच. त्यामुळेच भाऊ, प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही हक्काचे वाटत राहिले. भाऊ गेल्याची बातमी समजल्यानंतर खानापूर- आटपाडी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता अंत्यदर्शनासाठी धाव घेतली.

Web Title: MLA Anil Babar was close to common people and activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली