Sangli: पलूसमध्ये अल्पवयीन मुलीवर बापाकडून बलात्कार, नराधमास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 13:33 IST2025-05-23T13:30:18+5:302025-05-23T13:33:20+5:30
पलूस : तालुक्यातील एका गावात १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने दारूच्या नशेत वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. ...

Sangli: पलूसमध्ये अल्पवयीन मुलीवर बापाकडून बलात्कार, नराधमास अटक
पलूस : तालुक्यातील एका गावात १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने दारूच्या नशेत वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या आईने बुधवारी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई परगावी राहते. त्यामुळे पीडित मुलगी आजीसोबत राहत होती. १९ मे रोजी वार्षिक परीक्षा देऊन ती घरी आल्यावर रात्री जेवण करून आजीजवळ झोपली. नराधम बाप दारू पिऊन घरी आला. त्याने आजीच्या कुशीत झोपलेल्या मुलीला अलगद बाजूस करुन दुसऱ्या खोलीत नेले. तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलीस त्रास होऊ लागल्याचे लक्षात येताच त्याने तिला सोडून दिले.
पुन्हा त्याने घरी कोणी नाही, हे पाहून तेच कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने जवळच असणाऱ्या आत्याच्या घरी धाव घेतली. घडल्या प्रकाराबाबत कोणाला काहीच सांगितले नाही. बापाने गोड बोलून आत्याच्या घरातून तिला पुन्हा घरी नेले व पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर मुलीने धाडस करून घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.
आईने क्षणाचाही विलंब न करता सरळ पोलिस ठाणे गाठत पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ आरोपीस ताब्यात घेतले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.