सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:52 IST2025-05-03T13:51:49+5:302025-05-03T13:52:14+5:30
शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध
सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सांगलीत गुरुवारी तू-तू-मैं-मैंचा प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांनी पाटील यांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, पालकमंत्री पाटील यांनी बसून नाही, उभं राहूनच चर्चा होणार, अशी भूमिका घेतली. यावेळी त्यांनी शांततेत बोला, असा दमदेखील आंदोलकांना भरला. गुरुवारी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा सर्व प्रकार घडल्यामुळे आंदोलकही आक्रमक झाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्कप्रमुख शरद पवार गव्हाण, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत यांच्यासह शेतकऱ्यांनी गुरुवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी भेटीवरून संघटना प्रतिनिधी आणि पालकमंत्री पाटील यांच्यात वादावादीचे प्रकार घडले.
आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बसून चर्चा करण्याची विनंती केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी आत बसून नाही, इथं उभं राहूनच बोलणार, अशी दादागिरी चालणार नाही, असे सुनावले. उभं राहून बोला, मी थांबलो आहे ना येथे. पळून चाललो आहे का? असा सवालही त्यांनी आंदोलकांना केला.
शेतकऱ्यांचे अश्रू कधी दिसणार? : दिगंबर कांबळे
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी टाहो फोडून सांगत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून निषेध नोंदविला आहे. इतकं असूनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील फक्त पाच लोकांचा विरोध आहे, असे म्हणत आहेत. बाकी लोकांचे समर्थन आहे, असा दावा करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू का दिसत नाहीत? हा बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.