Sangli: टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:08 IST2025-02-04T19:08:19+5:302025-02-04T19:08:45+5:30

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथकाकडील औषध निर्माण अधिकारी जालिंदर महादेव कांबळे यांना टी.टी.चे ...

Medical officer beaten up for asking why he is not giving TT injection in Sangli | Sangli: टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण

Sangli: टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण

तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथकाकडील औषध निर्माण अधिकारी जालिंदर महादेव कांबळे यांना टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस, असा जाब विचारत सावर्डे येथील गजेंद्र शिवाजी पाटील याने शिवीगाळ करत मारहाण केली. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पाटील यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी कांबळे यांनी गजेंद्र पाटील यांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सावर्डे येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य पथक आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील या मासिक अहवाल देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे गेल्या होत्या. याचवेळी तात्यासाहेब जगन्नाथ सदाकळे यांना जखम झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, गजेंद्र शिवाजी पाटील हा आरोग्य पथकात घेऊन आला होता. यावेळी औषध निर्माण अधिकारी कांबळे यांनी सदाकळे यांचा केस पेपर नोंद करून त्यांच्यावर औषधोपचार केला. मात्र, यावेळी गजेंद्र पाटील याने कांबळे यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. ‘टीटीचे इंजेक्शन का देत नाहीस?’ असा जाब विचारत शिवीगाळ करू लागला.

यावेळी त्यांनी ‘याठिकाणी इंजेक्शन देण्याची सोय नाही. तुम्ही चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जा,’ असे समजावून सांगितले. मात्र, पाटील याने शिवीगाळ करत, दमदाटी करून दवाखान्यातील साहित्य विस्कटून लावले. दवाखान्याबाहेर ओढत नेत चप्पलने मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणून पाठीत, हातावर, पायावर, डोक्यात मारहाण करून जखमी केले. त्याचवेळी डॉक्टर पाटील त्याठिकाणी आल्या. त्यांनी पाटील याला ‘मारहाण कशासाठी करत आहेस? असे विचारले असता, पाटीलने डॉ. पाटील यांनाही शिवीगाळ केली. अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.

Web Title: Medical officer beaten up for asking why he is not giving TT injection in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.