सांगली : धामणी रस्त्यावरील इमारतीचे बांधकाम सुरू असताना उंचावरून पडून रमण प्रकाश पवार (वय ३५, रा. महावीर पार्क, शक्ती अपार्टमेंट, सांगली) हा गवंडी जागीच ठार झाला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रमणच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर नितेश पवार (वय ४०, रा. सम्राट व्यायाम मंडळ समोर, सांगली), मुकादम साबू शरनाप्पा वालेकर (३४, रा. विजयनगर, पूर्वा गार्डन पाठीमागे, सांगली) आणि भगवान शरणाप्पा वालेकर (४०, रा. विजयनगर) यांच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मृत रमणचा भाऊ आशिष पवार (रा. सावळी, ता. मिरज) याने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमण पवार हा गवंडी काम करत होता. सांगलीत महावीर पार्कजवळ तो पत्नी, दोन मुलांसह राहत होता. काही दिवसांपासून धामणी रस्त्यावरील आवटी गॅरेजच्या समोर नवीन सुरू असलेल्या इमारतीमध्ये तो गवंडी काम करत होता. मंगळवारी बांधकाम करताना तो इमारतीवरून खाली पडला. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा जाळी न लावल्यामुळे खाली पडल्यानंतर गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारांनी रमण याला उपचारास सिव्हिलमध्ये दाखल केले. परंतु, तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.रमण याचा मृत्यू झाल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच्या नातेवाइकांना कळवले. त्यामुळे तातडीने त्यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. रमण याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. रमण याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याचा भाऊ आशिष पवार याने गुरुवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे सुरक्षेची खबरदारी घेतली नसल्यामुळे कंत्राटदार व मुकादम यांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा यामुळे रमण हा इमारतीवरून पडून ठार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कंत्राटदार नितेश पवार, मुकादम साबू वालेकर, भगवान वालेकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीत बांधकाम करताना उंच इमारतीवरुन पडून गवंडी ठार, तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:22 IST