अनुदानाच्या आमिषाने महिलांचे सोने लुटणारा अटकेत, परराज्यातील भामटा सांगलीत जेरबंद
By घनशाम नवाथे | Updated: April 11, 2024 15:21 IST2024-04-11T15:19:49+5:302024-04-11T15:21:07+5:30
झडती घेतल्यानंतर २ लाख २ हजार ५०० रूपयांचे साेन्याचे दागिने मिळाले

अनुदानाच्या आमिषाने महिलांचे सोने लुटणारा अटकेत, परराज्यातील भामटा सांगलीत जेरबंद
सांगली : सरकारी अनुदानाचे पैसे मिळवून देतो असे सांगून महिलांची फसवणूक करून सोने लुटणारा भामटा विशाल कल्लाप्पा कांबळे (वय ४५, रा. केईपी कॉलनी, चिंचली, ता. रायबाग, जि. बेळगाव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दोन लाखाचे सोने हस्तगत केले.
अधिक माहिती अशी, जिल्ह्यातील जत आणि तासगाव पोलिस ठाणे हद्दीत महिलांना सरकारी अनुदानाचे किंवा पेन्शनचे पैसे मिळवून देतो, आधारकार्ड घेऊन चला असे सांगून दुचाकीवरून नेऊन वाटेत अंगावरील सोने काढून घेऊन पलायन केल्याचे प्रकार घडले होते. अशा प्रकारचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल कांबळे हा सांगलीतील शिवशंभो चौक ते कर्नाळ रस्ता परिसरात विना नंबरप्लेटची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सागर लवटे यांना मिळाली.
त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने कर्नाळ रस्त्याकडे धाव घेतली. तेथे पाहणी करताना संशयित दुचाकीवर थांबलेला दिसला. त्याला पलायनाची संधी न देता ताब्यात घेतले. चौकशीत विशाल कांबळे असे नाव सांगितले. त्याची झडती घेतल्यानंतर २ लाख २ हजार ५०० रूपयांचे साेन्याचे दागिने मिळाले.
दागिन्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने सावळज (ता. तासगाव) व जतमधील विठ्ठलनगर येथे महिलांना सरकारी अनुदानाचे आमिष दाखवून फसवून सोने काढून घेतल्याची कबुली दिली. विशाल कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध अपहार करून फसवणूक करणे तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पवार, उपनिरीक्षक पाटील, कर्मचारी सागर लवटे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरीबा बंडगर, अमर नरळे, उदयसिंह माळी, संदीप नलावडे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.