Sangli: बहिण म्हणून कारागृहात आरोपीला भेटायला आली, बनाव उघडकीस येताच महिला शिपाईच्या अंगावर जात शिवीगाळ केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 15:52 IST2025-02-01T15:51:27+5:302025-02-01T15:52:44+5:30

संशयिताच्या आई-वडिलांसह तिघांवर गुन्हा

Make to meet the accused in Sangli Jail Detect forgery from Aadhaar card photo | Sangli: बहिण म्हणून कारागृहात आरोपीला भेटायला आली, बनाव उघडकीस येताच महिला शिपाईच्या अंगावर जात शिवीगाळ केली

Sangli: बहिण म्हणून कारागृहात आरोपीला भेटायला आली, बनाव उघडकीस येताच महिला शिपाईच्या अंगावर जात शिवीगाळ केली

सांगली : येथील जिल्हा कारागृहात ‘पोक्सो’च्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला भेटण्यासाठी आई-वडिलांबरोबर चक्क अल्पवयीन मुलगी आली होती. तीने संशयिताची बहीण असल्याचे भासविण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. यावेळी संशयिताची आई व मुलीने कारागृहातील महिला शिपाईच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. तसेच इतर कैद्यांचा सुरू असलेला मुलाखतीचा कार्यक्रम बंद पाडला.

याप्रकरणी कारागृहातील महिला शिपाई वैशाली काशिनाथ जाधवर यांनी संशयित सचिन माडेकर (वय ४५), महादेवी सचिन माडेकर (४०, मूळ रा. निपाणी, सध्या रा. चांदणी चौक, इचलकरंजी) व पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हा कारागृहात ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल असलेल्या अनिकेत सचिन माडेकर याला भेटण्यासाठी त्याचे वडील सचिन व आई महादेवी माडेकर आले होते. तसेच आई-वडिलांबरोबर एक अल्पवयीन युवती आली होती. तीने अनिकेत याची बहीण निकिता सचिन माडेकर असल्याचे सांगितले. तसेच निकिताच्या नावाचे आधारकार्ड सादर केले. कागदपत्र पडताळणीवेळी निकिताच्या आधारकार्डवरील फोटो आणि प्रत्यक्षात समोर असलेली मुलगी वेगवेगळी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महिला शिपाई जाधवर यांनी वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. त्यांनी खात्री केल्यानंतर निकिता माडेकर हिचे आधारकार्ड दाखवून गुन्ह्यातील पीडित युवती असल्याचे समजले. 

त्यामुळे अनिकेतच्या आई-वडिलांना आधारकार्ड दाखविण्यास सांगितले. तेव्हा अनिकेतचे वडील सचिन याने ‘प्रत्येकवेळी तुम्हाला आधारकार्ड का दाखवायचे, तुम्हाला नोंदी ठेवता येत नाही. शहाणपण करू नका, तुम्हाला बघून घेतो, तुमच्याविषयी कोर्टात तक्रार करतो’ अशी धमकी दिली. यावेळी महादेवी माडेकर आणि पीडित युवती या दोघी महिला शिपाई जाधवर यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यांनी शिवीगाळ केली. आम्हाला भेट कशी घडवून देत नाही असे म्हणून गोंधळ घातला. तसेच इतर कैद्यांच्या सुरू असलेल्या भेटी बंद पाडल्या.

अखेर कारागृहातील कर्मचाऱ्यांनी येऊन सर्वांना ताब्यात घेतले. शहर पोलिसांना हा प्रकार कळविला. याबाबत जाधवर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

कारागृहाची सतर्कता

कारागृह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे संशयित आरोपीची बहीण म्हणून चक्क दुसरीच युवती आल्याचे उघडकीस आले. संबंधित तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

Web Title: Make to meet the accused in Sangli Jail Detect forgery from Aadhaar card photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.