'अलमट्टी' उंची वाढीला विरोध करण्यात महाराष्ट्र पिछाडीवर - विशाल पाटील; वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटकसाठी पोषक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:14 IST2025-04-09T19:13:42+5:302025-04-09T19:14:07+5:30
तीन जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळू : अरुण लाड

'अलमट्टी' उंची वाढीला विरोध करण्यात महाराष्ट्र पिछाडीवर - विशाल पाटील; वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटकसाठी पोषक
सांगली : माजी जलसंपदा सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनेच अलमट्टी धरणामुळेसांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना पूर येत नाही, असा अहवाल दिला. हा अहवालच अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटकला पोषक आहे. अलमट्टी धरणामुळे पूर येतो, असे म्हणण्यासाठी एकही अहवाल महाराष्ट्र सरकारकडे नाही, असा आरोप सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केला. त्यामुळेच केंद्र सरकारकडे अलमट्टीविरोधात भूमिका मांडताना अडचणी येत आहेत, असेही ते म्हणाले.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हालचाली चालू आहेत. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस आमदार रोहित पाटील उपस्थित होते.
विशाल पाटील म्हणाले, कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने एकही याचिका दाखल केलेली नाही. याबद्दल महाराष्ट्राच्या जलसंपदा मंत्र्यांनाही माहिती नाही, हे त्यापेक्षाही धक्कादायक आहे. मुळात महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी अडवण्यात आपण खूपच मागे पडलो आहोत. तसेच अलमट्टी धरणामुळे खरेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पूर येतो का? हे मांडण्यातही महाराष्ट्र सरकार खूपच मागे आहे.
पुन्हा तज्ज्ञ समिती नेमण्याची गरज
अलमट्टी धरणामुळेच पूर येतो, हे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. या समितीचा अहवाल काय येईल, त्या माहितीवरच आपणास पुन्हा केंद्र शासनाकडे महाराष्ट्राची बाजू मांडता येईल. तसेच सर्वोच्च न्यायालयातही आपल्याला जाता येणार आहे, असेही विशाल पाटील म्हणाले.
तीन जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळू : अरुण लाड
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारने सर्व तयारी केली आहे. याविरोधात महाराष्ट्र सरकार काहीच करत नाही. या झोपी गेलेल्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात येईल. याबाबतची लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल, असे आमदार अरुण लाड यांनी सांगितले.