Maharashtra Election 2019: If they kill one, we'll kill 10 - Amit Shah | Maharashtra Election 2019: ...त्यांनी एक मारला, तर आम्ही १० मारू; अमित शहा यांनी पाकिस्तानला ठणकावले
Maharashtra Election 2019: ...त्यांनी एक मारला, तर आम्ही १० मारू; अमित शहा यांनी पाकिस्तानला ठणकावले

जत (जि. सांगली) : काश्मीर खोऱ्यात सर्वत्र शांतता आहे. मात्र पाकिस्तान कुरघोडी करू पाहत आहे. मात्र त्यांच्याकडून आमचा एक जवान शहीद झाला तरी आम्ही त्यांचे दहा सैनिक मारू, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी पाकिस्तानला ठणकावले. ते प्रचारसभेत बोलत होते. 

अमित शहा सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये आले आहेत. त्यांनी आज जत, तुळजापूर, अक्कलकोट, किल्लारी, औसा (लातूर) आदी ठिकाणच्या जाहीर सभांमधून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. पण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक काळामध्ये काँग्रेस पक्ष दिसत नाही. तो पक्ष जणू निवडणुकांपासून पळ काढत आहे, अशी टीका शहा यांनी केली.

अमित शहा म्हणाले, राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. तसेच ३७० कलम, तिहेरी तलाक व काश्मीर प्रश्न या विषयांसंदर्भात शरद पवार यांनी भूमिका जाहीर करावी, असे आव्हानही भाजपाध्यक्षांनी जाहीर सभांमधून दिले. देवेंद्र फडणवीस सरकारची पाठराखण करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याची आर्थिक पत वाढवली आहे.

काँग्रेसच्या काळात वसंतराव नाईक यांच्याखेरीज एकाही मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. परंतु देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिले. यापुढेही तेच मुख्यमंत्री राहतील. विधानसभेतील २८८ पैकी २२२ जागा भाजप व मित्रपक्षांना
मिळतील, असा दावा सभांमधून अमित शहा यांनी केला. अमित शहा महाराष्ट्रामध्ये आणखी काही सभा घेणार आहेत.

जागतिक पातळीवर पाकिस्तान एकाकी
काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तान जागतिक पातळीवर एकाकी पडला आहे. संपूर्ण काश्मीर शांत आहे; परंतु काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाली आहे, असा विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. मागील ७० वर्षांपासून काश्मीरचा प्रश्न प्रलंबित होता. तो भारताचा एक अविभाज्य भाग असून, दोन झेंडे, दोन नियम देशात असू शकत नाहीत. देशात पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांचे अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काश्मीरचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरक्षित ठेवले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: If they kill one, we'll kill 10 - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.