सांगली जिल्ह्यातील एक लाखावर शेतकऱ्यांना ९४९ कोटींचा कर्जपुरवठा, तालुकानिहाय पीक कर्ज वाटप..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:45 IST2025-07-31T17:43:42+5:302025-07-31T17:45:13+5:30
जिल्हा बँकेकडून पतपुरवठ्यात आघाडी : उद्दिष्टाच्या ७८ टक्के कर्ज वाटप

सांगली जिल्ह्यातील एक लाखावर शेतकऱ्यांना ९४९ कोटींचा कर्जपुरवठा, तालुकानिहाय पीक कर्ज वाटप..जाणून घ्या
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना ९४९ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या ७८ टक्के कर्ज पुरवठा केला असून कर्ज वाटपासाठी सप्टेंबरअखेर मुदत आहे. बँक शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनीही या कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले आहे.
खरीप हंगामातील पेरणीसाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग असते. त्यासाठी त्यांना जून महिन्यापूर्वीच पीक कर्ज मिळणे गरजेचे असते. परंतु मे आणि जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरण्यांना विलंब झाला आहे. तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज आकारले जाते. जिल्हा बँकेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात अन्य राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा मोठा वाटा असतो.
सध्या बँकेकडून खरीप हंगामासाठी भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ऊस, कापूस, द्राक्षे, डाळिंब, हळद व इतर पिकांना कर्ज वाटप करण्यात येत आहे. यावर्षी खरिपासाठी बँकेला एक हजार १०० कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत ९४८ कोटी ९२ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. हे प्रमाण उद्दिष्टाच्या ७८ टक्के आहे. या पीक कर्ज वाटपास सप्टेंबर अखेर मुदत असल्याने बँक उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एक लाख पाच हजार १३८ शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे.
तालुकानिहाय पीक कर्ज वाटप
तालुका / वाटप कर्ज / शेतकरी संख्या
शिराळा - ५३.८० कोटी / १२०२१
वाळवा - १३२.९३ कोटी / १५८८०
मिरज - १३६.८५ कोटी / १२२२७
कवठे महांकाळ - १०९.४२ कोटी /२६७१
जत - १०४.७९ कोटी / १६३३०
तासगाव - १२५.९१ कोटी / ८४८२
खानापूर - ६६.३३ कोटी / ५४०७
आटपाडी - ६७.३० कोटी / ८७४२
पलूस - ६७.३५ कोटी / ५९६४
कडेगाव - ९४.१८ कोटी / ७४१४