साहित्य संमेलनांमुळे साहित्यिकांना ऊर्जा
By Admin | Updated: August 3, 2014 22:44 IST2014-08-03T21:31:44+5:302014-08-03T22:44:26+5:30
सतीश काळसेकर : पलूसला परिवर्तनवादी संमेलनाचे उदघाटन

साहित्य संमेलनांमुळे साहित्यिकांना ऊर्जा
पलूस : ग्रामीण भागातील साहित्य संमेलनांमुळे सर्व साहित्यिकांना एक प्रकारची ऊर्जा मिळते. जगणं आणि लिहिणं यातील अंतर नष्ट करणारं साहित्य निर्माण झालं पाहिजे. जगणं कृत्रिम असेल, तर साहित्य निरर्थक ठरेल. वास्तवाचे भान कवींनी ठेवले पाहिजे. परिवर्तनवाद्यांनी महात्मा फुले, चार्वाक यांचा वारसा जपण्याची गरज आहे, तरच परिवर्तन घडून येईल, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी सतीश काळसेकर यांनी व्यक्त केले.
पलूस येथे रविवारी श्री समर्थ साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ, सांगली जिल्हा प्रगतीशील लेखक संघ व समाजवादी प्रबोधिनी आणि परिवर्तनवादी संघटना यांच्या सहयोगाने बाराव्या परिवर्तन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून काळसेकर बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन झाले.संमेलनाचे उद्घाटक प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, साहित्य संमेलने ही आजच्या काळात शाळा आणि महाविद्यालयांना ऊर्जा पुरविणारी केंद्रे आहेत. जीवन आणि विचार यांची सांगड घालणारा कवी असावा. नवे साहित्यिक निर्माण करणारी प्रयोगशाळा म्हणजे ही संमेलने आहेत. परिवर्तन साहित्यामधून दृष्टी, प्रेरणा व विचार मिळतो.
डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, साहित्य संमेलने ‘चळवळ’ झाली पाहिजे. साहित्यिकांनी जनतेच्या वेदनांची जाणीव ठेवली पाहिजे.
यावेळी सु. धो. मोहिते, ऋतुजा माने, वैजयंती पेठकर, वैशाली कोळेकर, दीपक पवार, रमेश भुते, एल. ए. पाटील, महेश पुदाले, केदार कोळी, सुजाता माने, गोमटेश चौगुले आणि मोहन लोहार यांचा सत्कार करण्यात आला. कवी किरण शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख ज्येष्ठ प्रबोधक व्ही. वाय. पाटील यांनी करून दिली. कार्यक्रमासाठी कवी ज्ञानेश्वर कोळी, संपतराव पवार, जानकीताई भोसले, राजाराम माळी, डॉ. बी. एन. पवार, शामराव टोणपे, अशोक नार्वेकर उपस्थित होते. संमेलनाचे संयोजन कवी किरण शिंदे यांच्यासह कुमार गायकवाड, मारुती शिरतोडे, अॅड. सतीश लोखंडे, संजीव तोडकर यांनी केले. सूत्रसंचालन आनंद हाबळे यांनी केले. प्रा. रवींद्र येवले यांनी आभार मानले. (वार्ताहर)