Sangli: एलआयसी अधिकाऱ्याला मिरजेत सव्वा कोटींचा गंडा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:11 IST2024-12-14T12:11:24+5:302024-12-14T12:11:51+5:30
ऑनलाइन पद्धतीने फसवणूक

Sangli: एलआयसी अधिकाऱ्याला मिरजेत सव्वा कोटींचा गंडा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
मिरज : मिरजेतील एलआयसीच्या विकास अधिकाऱ्यास भामट्या दाम्पत्याने व्हॉटस्ॲप कॉल करून संपर्क साधला. ब्लॅकमेल करत एक कोटी ३७ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी आयुर्विमा अधिकाऱ्याने मिरज शहर पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. २४ मार्च २०२२ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत त्यांनी फिर्याद दिली.
मिरजेत एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याशी दीपक वाधवा व त्याची पत्नी कोमल ऊर्फ कोमलदेवी वाधवा असे नाव सांगून भामट्या दाम्पत्याने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून संपर्क साधला. सुरुवातीला व्हॉटस्ॲप कॉल करून संपर्क साधत ते रविता सोनी असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्याच्या परिचिताशी ओळख असल्याचे भासवून पैशाची मागणी केली. त्यांना पैसे दिल्यानंतर त्यांनी पुन्हा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
वाधवा दाम्पत्याने या अधिकाऱ्याकडून गेल्या दोन वर्षांत एक कोटी ३७ लाख ११ हजार ३७९ रुपये बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने घेतले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्याने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार दीपक वाधवा व कोमल वाधवा ऊर्फ कोमलदेवी दोमराज (पूर्ण नाव व पत्ता नाही) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली होती.