Sangli: कणदूर येथे भरदिवसा शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांमध्ये घबराट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:49 IST2026-03-28T20:49:06+5:302026-03-28T20:49:54+5:30

आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. 

Leopard attacks farmer in broad daylight in Kandur Sangli | Sangli: कणदूर येथे भरदिवसा शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांमध्ये घबराट 

Sangli: कणदूर येथे भरदिवसा शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांमध्ये घबराट 

सहदेव खोत

पुनवत: कणदूर ता. शिराळा येथे शेतकरी जगन्नाथ बाळू गुंडणके (वय ६०) यांच्यावर शेतात पाणी पाजत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. त्यामध्ये त्यांच्या हाताला खोलवर जखमा झाल्या असून शिराळा येथे  उपजिल्हा रुग्णालयात  प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कणदूर गंगानगर येथील शेतकरी जगन्नाथ बाळू गुंडणके हे आपल्या वारणा कालव्याजवळ माळ नावाच्या शेतात हत्ती गवताला पाणी देण्यासाठी दुपारी गेले होते. शेतात काम करत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. यात जगन्नाथ गुंडणके यांच्या हाताला खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. 

यावेळी गणेश गुंडणके, अजित गुंडणके व स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने गावात आणून पुढील उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यावेळी शिराळा नगराध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक, रणधीर नाईक माजी सरपंच रघुनाथ पाटील यांनी भेट देऊन जखमीची विचारपूस केली. गुंडणके यांच्या जखमा खोलवर असल्याने व रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

याघटनेमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. या बिबट्याचा वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करून शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. दरम्यान, उप वनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे  तसेच वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर,सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, संतोष कदम,संकेत गायकवाड, हर्षद जाधव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्याठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.

या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्यावर योग्य ते उपचार तातडीने करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत. तसेच वन विभागाने येथे पिंजरा लावला असून जखमीला उपचारासाठी तातडीची मदत मिळवून देऊ. -  सत्यजित देशमुख, आमदार

Web Title : सांगली: कणदूर में तेंदुए का किसान पर हमला; किसानों में दहशत।

Web Summary : सांगली के कणदूर में, एक तेंदुए ने किसान जगन्नाथ गुंडणके पर हमला किया, जब वह अपने खेत की सिंचाई कर रहे थे। गंभीर रूप से घायल होने पर, उन्हें इलाज के लिए कोल्हापुर ले जाया गया। घटना के बाद वन विभाग ने तेंदुए को पकड़ने के लिए पिंजरा लगाया है।

Web Title : Leopard attacks farmer in Sangli; panic spreads among farmers.

Web Summary : In Sangli's Kandur, a leopard attacked farmer Jagannath Gundanke while he was irrigating his field. Seriously injured, he was moved to Kolhapur for treatment. The forest department has set up a cage to catch the leopard following the incident.