‘अलमट्टी’प्रश्नी नेत्यांची उदासीनता; जलआयोगाला पाच हजार पत्र पाठवून उंची वाढवण्यास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:59 IST2025-04-08T17:59:18+5:302025-04-08T17:59:46+5:30
मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?

‘अलमट्टी’प्रश्नी नेत्यांची उदासीनता; जलआयोगाला पाच हजार पत्र पाठवून उंची वाढवण्यास विरोध
सांगली : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला २००५, २०१९, २०२१ च्या महापुरानंतरही जिल्ह्यातील खासदार, आमदार अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्यावर काहीही बोलत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारकडे विरोध करत नसल्यामुळे सांगलीकरांना महापुराचा सामना करावा लागणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणत्याच हालचाली नाहीत, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, यासाठी केंद्रीय जलआयोगाला पाच हजार पत्रं पाठविणार आहे, असेही ते म्हणाले.
सांगलीत कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. यावेळी सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, प्रमोद माने, प्रदीप वायचळ, सतीश रांजणे, डॉ. अभिषेक दिवाण, संजय कोरे, ओंकार दिवाण, हेमंत बावलेकर, दिनकर पवार, विजयकुमार खटावकर आदी उपस्थित होते.
सर्जेराव पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आंध्र प्रदेश सर्वोच्च न्यायालयात २५ एप्रिल २००० मध्ये आंध्र प्रदेश राज्याने हरकत घेतली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने धरणाच्या दरवाजाची उंची कमी करून ५१९.६० मीटर ठेवण्याचे आदेश दिले. पुढील पर्यावरणाची परवानगी घेऊन तसेच जलशक्ती मंत्रालयाची परवानगी घेऊन उंची वाढवण्याचा निर्णय घ्यावा, असे याचिकेत उत्तर दिले. याकडे दुर्लक्ष करून कर्नाटक पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि अधिकारी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. अधिसूचना निघावी म्हणून केंद्र शासनाकडे बैठकीची मागणी केली. कर्नाटक सरकारचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूरकी आयआयटी महाविद्यालयाकडून अलमट्टी धरणाच्या अभ्यासाचा अहवाल लवकर मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये सांगली पाटबंधारे यांनी भरले आहेत. तरीही दोन वर्षात अहवाल मिळत नाही. म्हणून कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीतर्फे पाच हजार तक्रारी केंद्रीय जलआयोग, प्रधानमंत्री कार्यालय, पर्यावरण विभाग, जलशक्ती मंत्रालय व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री पूर येण्याची वाट बघतात की काय?
पूर येऊ नये, यासाठी आम्ही काम करत आहे. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर येण्याची वाटप बघतात की काय, असा प्रश्न सांगलीकरांना पडला आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोणत्याच हालचाली दिसत नाहीत, असा आरोपही सर्जेराव पाटील यांनी केला. तसेच नागरिकच रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही त्यांनी दिला.