वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:55 IST2025-08-07T17:55:04+5:302025-08-07T17:55:30+5:30
पोलिसांनी विनयभंग व ‘ॲट्रॉसिटी’ सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : विटा येथील वकील विशाल कुंभार यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील वकील सांगलीत एकवटले. त्यांनी कामापासून अलिप्त राहत घटनेचा निषेध नोंदवला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदन दिले. वकील कुंभार यांना मारहाण करून घरातील ‘डीव्हीआर’ मशीन चोरणाऱ्या पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
विट्यातील वकील कुंभार यांच्या घराजवळ हद्दपार गुन्हेगार राहत असल्याच्या कारणावरून अनेक दिवसांपासून ८ ते १० पोलिस रात्री येऊन सेल्फी काढणे, मोठमोठ्याने दंगा करणे असे कृत्य करत होते. याबाबत त्रास होत असल्यामुळे कुंभार व परिसरातील नागरिकांनी तक्रार केली होती.
त्याचा राग मनात धरून शनिवारी रात्री आठ पोलिसांनी कुंभार यांना अंगावरील अर्ध्या कपड्यातच पोलिस गाडीत घालून शिवीगाळ करून फरफटत ठाण्यात नेल्याची कुंभार यांची तक्रार आहे. याप्रकरणी पोलिसांवर कारवाईसाठी विट्यात वकिलांनी मोर्चा काढला. परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. बुधवारी सर्व तालुक्यांतील वकील संघटनांचे पदाधिकारी सांगलीत एकवटले. त्यांनी एकत्र येत घटनेचा निषेध नोंदवला.
शेकडो वकिलांनी कामापासून अलिप्त राहत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कार्यालयासमोर एकत्र येऊन कारवाईची मागणी केली. वकिलांच्या शिष्टमंडळाने अधीक्षक घुगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. वकील विशाल कुंभार यांनी झालेल्या प्रकाराची माहिती दिली. शिष्टमंडळातील वकिलांनी कारवाईची मागणी केली. अधीक्षक घुगे यांनी याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अशोकराव वाघमोडे, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव, ॲड. सी.डी. माने, ॲड. गिरीश तपकिरे, ॲड. प्रमोद सुतार, ॲड.सुनील दोषी, ॲड. सविता शेडबाळे, विटा येथील ॲड. शौर्या पवार, ॲड. शैलेश हिंगमिरे, ॲड. दीपक शिंदे, ॲड. विक्रांत वडेर, ॲड. सर्जेराव मोहिते, ॲड. संदीप मुतालिक आदींसह वकील संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. अधीक्षक कार्यालयानंतर वकिलांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले.
अधीक्षक कार्यालयातच निषेध फलक झळकला
पोलिस अधीक्षक कार्यालयात शेकडो वकील एकवटल्यानंतर कार्यालयाच्या आवारातच विटा पोलिस ठाण्याचा जाहीर निषेध असा फलक झळकवण्यात आला. शेकडो वकिलांच्या गर्दीतील हा फलक लक्ष वेधून घेत होता.
विशाल कुंभार यांना अश्रू अनावर
विटा पोलिसांनी केलेल्या अन्यायाचा पाढा वाचताना विशाल कुंभार अश्रू रोखता आले नाहीत. आंदोलन थांबवा नाहीतर विनयभंग व ‘ॲट्रॉसिटी’ सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी पोलिसांनी दिल्याचे त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर सांगितले.