कुपवाड पाणी बिल घोटाळ्याची चौकशी होणार, सांगली महापालिका प्रशासनाकडून हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:45 IST2025-09-11T18:44:57+5:302025-09-11T18:45:17+5:30
नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर कार्यवाही

कुपवाड पाणी बिल घोटाळ्याची चौकशी होणार, सांगली महापालिका प्रशासनाकडून हालचाली
सांगली : कुपवाडमधील काही उपनगरात नागरिकांनी पाणीबिलापोटी पैसे घेऊन महापालिकेत भरणा केला नसल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत काही नागरिक तक्रारी करण्याच्या तयारीत आहेत. संबंधिताच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाकडून चौकशी सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पाणीपट्टी विभागाने याची दखल घेत प्राथमिक चौकशीला सुरूवात केली आहे.
दोन ते तीन वर्षापूर्वी महापालिकेत पाणी बिल घोटाळा चांगलाच गाजला होता. उपनगरे, विस्तारित भागात बोगस पाणी कनेक्शन देण्यात आली होती. तसेच काही नागरिकांकडून पैसे घेऊन त्याचा महापालिकेत भरणा करण्यात आला नव्हता. हे प्रकरण उजेडात येताच महापालिकेत खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाने बोगस कनेक्शनच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. या मोहिमत १९६ बोगस कनेक्शन मिळून आली. प्रशासनाने ही कनेक्शन नियमित केली. या घोटाळ्याचा ठपका घेऊन एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा विस्तारित भागात हाच प्रकार समोर आला आहे.
याबाबत नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांच्याकडे काही नागरिकांंनी तक्रारी केल्या. नवीन पाणी बिल आल्यानंतर त्यात थकबाकी दिसून आल्याने नागरिकही हादरले आहेत. त्याची दखल घेत पाणीपट्टी विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. नागरिकांच्या प्रत्यक्षात तक्रारी आल्यानंतर चौकशीला गती येईल, असे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी कराचा भरणा महापालिकेतच करावा. पैसे कर्मचाऱ्याकडे दिले तरी त्याच्याकडून पावती घ्यावी, असे आवाहन केले आहे.
९० हजाराचे बिल
एका ग्राहकाचे पाणी कनेक्शन व्यावसायिकवरून घरगुती करून घेतले होते. तरीही त्याला ९० हजाराचे पाणी बिल आहे. काही नागरिकांना थकबाकीसह बिले आली आहेत. मागील घोटाळ्याप्रमाणेच हा प्रकार दिसत असल्याचे नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी सांगितले.