Sangli: किर्लोस्करवाडी येथील रेल्वेच्या थांब्याचा पोरखेळ थांबणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:54 IST2024-12-31T17:54:13+5:302024-12-31T17:54:31+5:30
सांगली : रेल्वेला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या किर्लोस्करवाडी रेल्वेस्थानकास नेहमीच थांब्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. बुकिंगला येथील थांबा न ...

Sangli: किर्लोस्करवाडी येथील रेल्वेच्या थांब्याचा पोरखेळ थांबणार कधी?
सांगली : रेल्वेला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या किर्लोस्करवाडी रेल्वेस्थानकास नेहमीच थांब्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. बुकिंगला येथील थांबा न दर्शविता कागदोपत्री आलेख शून्य दाखवून थांबा रद्द करण्याचा प्रकार यापूर्वीही घडला होता. आता दादर ते हुबळी या गाडीच्या बाबतीतही असाच प्रकार दिसून येत असल्याने येथील प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत धावणारी दादर-हुबळी व हुबळी-दादर एक्सप्रेसला किर्लोस्करवाडीत थांबा दिला होता. ऑनलाइन बुकिंग करताना तसेच स्थानकावरील बुकिंगवेळी किर्लोस्करवाडीचा उल्लेख तिकिटावर होत होता. जानेवारी २०२५ पासून किर्लोस्करवाडी स्थानकाचा उल्लेख ऑनलाइन बुकिंगला दिसत नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. आता हा गोंधळ काही प्रमाणात कमी करीत रेल्वेने हुबळी ते दादर एक्सप्रेसकरिता थांबा दिला आहे.
बुकिंग पॅलेटवर किर्लोस्करवाडी थांबा दिसून येतो. मात्र, परतीच्या दादर-हुबळी एक्सप्रेसला थांबा दिसत नाही. मिरज जंक्शनचे तिकीट काढून प्रवाशांना किर्लोस्करवाडीत उतरण्याचा पर्याय दिला जातो. मात्र, हा पर्याय म्हणजे किर्लोस्करवाडीतील स्थानकाच्या नावे शून्य बुकिंगची लेखी नोंद होण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मागील अनुभवाचा अंदाज घेत येथील प्रवाशांनी या गोष्टीला विरोध केला आहे.
सहा गाड्यांचा थांबा रद्द
किर्लोस्करवाडी रेल्वेस्टेशनवर २०१९ मध्ये गांधीधाम-बेंगलोर एक्सप्रेस, बेंगलोर-गांधीधाम एक्सप्रेस, बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस, जोधपूर-बेंगलोर एक्सप्रेस, मैसूर-अजमेर एक्सप्रेस, अजमेर-मैसूर एक्सप्रेस आदी सहा लांबपल्ल्याच्या गाड्यांचा प्रायोगिक तत्त्वावर थांबा दिला होता. मात्र, बुकिंगमध्ये हा थांबा दिसत नसल्याने किर्लोस्करवाडीतील प्रवाशांना मिरजेतून किंवा मिरजेपर्यंतचे तिकीट दिले जायचे व उतरताना किर्लोस्करवाडीत उतरण्याचा पर्याय दिला जात होता. मात्र, यामुळे रेल्वेच्या दप्तरी किर्लोस्करवाडीचे बुकिंग शून्य नोंदले गेले. त्यामुळे कालांतराने येथील थांबे रद्द झाले.
प्रवासी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा
किर्लोस्करवाडी येथील मध्य रेल्वे प्रवासी संघटनेने स्टेशन प्रबंधकांना सोमवारी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, दादर ते हुबळी एक्सप्रेसचा थांबा ७ जानेवारीपासून बंद केला आहे. किर्लोस्करवाडीतून या गाडीला चांगले उत्पन्न मिळत असताना हा थांबा बंद केला आहे. तो सुरू करण्यात यावा, अन्यथा निर्णयाविरुद्ध बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना अध्यक्ष चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष राजाभाऊ माने, चंद्रशेखर माने, जीवन नार्वेकर, रामचंद्र दीक्षित उपस्थित होते.