Sangli- कवलापूर खून प्रकरण: संकेतच्या हल्लेखोरांच्या शोधासाठी १० पथके
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:50 IST2024-06-27T15:48:29+5:302024-06-27T15:50:17+5:30
अटकेतील आरोपींना कोठडी, आणखी तीन नावे निष्पन्न

Sangli- कवलापूर खून प्रकरण: संकेतच्या हल्लेखोरांच्या शोधासाठी १० पथके
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे संकेत उर्फ शुभम चन्नाप्पा नरळे या अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी अटकेतील संशयित आरोपींना न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सांगली ग्रामीण पोलिसांनी सर्वांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. याप्रकरणी सांगली पोलिस ठाण्यात सोळा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सहाजण अटकेत आहेत. दरम्यान, १० संशयितांचा पोलिस पथकाकडून कसून शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी सांगितले.
गजानन तावदारकर, सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील, दीपक माळी, वैभव तोडकर, विवेक पाटील, विशाल पाटील या अटक केलेल्या संशयितांना न्यायालयाच्या आदेशानुसार पाच दिवस कोठडीत ठेवले आहे. कवलापूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर सिद्धेश्वर चौकात जुन्या वादातून संकेत नरळे, जोतीराम माने व अन्य एका अल्पवयीन मुलाने सोमवारी रात्री कोयत्याने हल्ला केला. यात पाटील गंभीर जखमी झाले. त्यावेळी पाटील यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या जमावाच्या तावडीत संकेत सापडला.
सुमारे २०० ते ३०० ग्रामस्थांनी यावेळी चौकात गर्दी केली होती. जमावाने संकेतला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला भानुदास पाटील यांच्या तुकाई मळा येथील शेतात नेले. तेथे पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयित पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कवलापूरात धाव घेतली. जखमी संकेतला सांगलीत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मंगळवारी पहाटे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी सोळा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यातील सहाजणांना अटक केली.
आणखी तीन नावे निष्पन्न
पोलिस तपासात आणखी तीन हल्लेखोर ग्रामस्थांची नावे निष्पन्न झाली आहेत. इतर सहा ते सातजण पसार आहेत. या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके कर्नाटक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यात रवाना करण्यात आली आहेत. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर पोलिसांनी लक्ष ठेवले असून त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.