सांगलीच्या काजलने फडकावला कठीण 'डांग्या सुळक्या'वर तिरंगा, महाराष्ट्रातील पहिलीच दिव्यांग महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 17:15 IST2022-12-24T17:15:38+5:302022-12-24T17:15:59+5:30
एका पायाने दिव्यांग असलेल्या काजलसाठी हे मोठे आव्हान होते, तरीही आत्मविश्वास आणि अनुभवाच्या जोरावर तिने सर केले.

सांगलीच्या काजलने फडकावला कठीण 'डांग्या सुळक्या'वर तिरंगा, महाराष्ट्रातील पहिलीच दिव्यांग महिला
सांगली : सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळे हिने नाशिक जिल्ह्यातील डांग्या सुळका यशस्वीरित्या सर केला. कठीण श्रेणीतील हा सुळका सर करणारी महाराष्ट्रातील ती पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे.
मनाचा थरकाप आणि काळजाची धडधड वाढवणारे सह्याद्रीचे रूप म्हणजे नाशकातील सुळके. इगतपुरी तालुक्यात दहेगावजवळील कठीण श्रेणीतील डांग्या सुळका. गिर्यारोहकांसाठी नेहमीच आव्हान समजला जातो. १८ डिसेंबर रोजी गिर्यारोहकांच्या पथकाने डांग्या सुळका आरोहन मोहीम आयोजित केली होती. त्यामध्ये सांगलीच्या दिव्यांग काजलने सहभाग घेतला. सकाळी सप्रेवाडी गावातून सुरुवात झाली. सुमारे २०० फूट उंच सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर प्रत्येकाने एका वेळी एक अशी चढाई सुरू केली.
एका पायाने दिव्यांग असलेल्या काजलसाठी हे मोठे आव्हान होते, तरीही आत्मविश्वास आणि अनुभवाच्या जोरावर तिने सर केले. माथ्यावर पोहोचल्यावर तिरंगा फडकवत ‘भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.
या मोहिमेसाठी काजलला जॉकी साळुंखे, चेतन शिंदे, डॉ. समीर भिसे, राजश्री चौधरी, भरत, ज्ञानू आदींनी मार्गदर्शन व सहकार्य केले. मोहिमेत काजलसह शिवाजी जाधव, अथर्व शेटे, विजय मेटकरी, सुहास कातळकर, डॉ. समीर भिसे आदी गिर्यारोहकांचा सहभाग होता.
काजलने यापूर्वीही कळसुबाई शिखरासह अनेक गड, किल्ले सर केले आहेत. वजीर, हिरकणी कडा, मोरोशीचा भैरवगडसारखे कठीण सुळके, गड सर केले आहेत.