Sangli-Local Body Election: विकास झाला गायब, नुसतीच चिखलफेक; प्रचारातील भाषा घसरू लागली
By संतोष भिसे | Updated: November 25, 2025 19:01 IST2025-11-25T19:01:11+5:302025-11-25T19:01:26+5:30
उणीदुणी काढण्यावरच भर

Sangli-Local Body Election: विकास झाला गायब, नुसतीच चिखलफेक; प्रचारातील भाषा घसरू लागली
संतोष भिसे
सांगली : नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत प्रचारासाठी फारच थोडा कालावधी असल्याने उमेदवारांची धांदल उडाली आहे. रात्र थोडी आणि सोंगे फार अशी त्यांची अवस्था झाली आहे. प्रचाराच्या या धांदलीत विकासाचे मुद्दे गायब झाले असून, मी चांगला आणि विरोधक वाईट हेच पटवून सांगण्याची अहमहमिका लागली आहे.
जिल्ह्यातील सर्वच म्हणजे आठही नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींत काटाजोड लढती दिसत आहेत. विशेषत: जत, आटपाडी, ईश्वरपूर, पलूस, विटा येथे राजकीय अस्तित्वाच्या लढती दिसून येत आहेत. नगरसेवक पदासोबतच नगराध्यक्षपदासाठीही नेतेमंडळींनी कंबर कसली आहे. त्यामुळे तर राजकीय संघर्ष अधिकच टोकदार झाला आहे. पहिल्या टप्प्यात शहराच्या विकासाच्या गोष्टी करणारा प्रचार आता एकमेकांची उणीदुणी काढण्यावर गेला आहे. प्रचाराच्या भाषेत आता शिवराळपणा येऊ लागला आहे.
ही पाहा तुमच्या भावी नगरसेवकाची मुक्ताफळे
जतच्या एका नेत्याला थेट मूर्ख आणि थापाड्या ठरविण्यात आले आहे. तासगावच्या प्रचारात धनशक्तीचा उल्लेख वारंवार सुरू आहे. विट्याच्या निवडणुकीत एकाधिकारशाहीचा मुद्दा उचलला जात आहे. गावागावांत भांडणे लावण्याचा उद्योग सुरू असल्याचीही टीका सुरू आहे.
...तर प्रत्येक शहर सिंगापूर बनेल
उमेदवारांचे, आघाड्यांचे जाहीरनामे फक्त कागदावरच दिसत आहेत. या जाहीरनाम्यांची १०० टक्के अमंलबजावणी केली, तर प्रत्येक शहर सिंगापूर बनल्याशिवाय राहणार नाही. जाहीरनाम्यातील योजना इतक्या गोडगुलाबी आहेत, की उमेदवारांच्या कल्पकतेचे कौतुकच करावेसे वाटल्यावाचून राहत नाही. नुकत्याच जन्मलेल्या अर्भकापासून स्मशानात पोहोचलेल्या मृतापर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही तरतूद जाहीरनाम्यात केली आहे.
‘एकदा सत्ता द्या, विकास काय असतो ते दाखवतो’
‘एकदा सत्ता द्या, विकास काय असतो ते दाखवतो’ अशा वल्गना सर्वच नगरपालिकांच्या निवडणूक प्रचारात ऐकायला मिळत आहेत. अर्थात, आजवरचा राजकीय इतिहास पाहता उमेदवारांच्या या वल्गना कधीच खऱ्या ठरलेल्या नाहीत. विजयाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर गायब झालेला उमेदवार पुढच्या निवडणुकीलाच प्रभागात उगवतो हा मतदारांचा अनुभव आहे.
एकसारख्या समस्या, एकसारखी आश्वासने
ईश्वरपूरपासून जतपर्यंत आणि शिराळ्यापासून विट्यापर्यंतच्या प्रत्येक शहरातील समस्या थोड्याफार फरकाने एकसारख्याच आहेत. वाहतुकीची कोंडी, पिण्याच्या पाण्याची समस्या, अतिक्रमणे, उखडलेले रस्ते या तक्रारी सर्वत्र आहेत. ‘शहराचे सिंगापूर करतो’ अशा बाता मारणाऱ्या कारभाऱ्यांना सत्तेत गेल्यानंतर या समस्या आजवर कधीच दिसलेल्या नाहीत. टक्केवारीची कीड तर सर्वत्रच आहे.