भंगार साहित्यात आलेले दागिने केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:30 IST2019-10-04T15:29:36+5:302019-10-04T15:30:40+5:30
आजकाल प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे. काही धंदेवाल्यांना तर लबाडीचा शिक्का घेऊनच फिरावे लागते. परंतु चिकुर्डे (ता. वाळवा) येथील विक्रम दत्तू शिंदे या भंगार व्यापाऱ्याने भंगारात सापडलेले सहा तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने प्रामाणिकपणे परत देऊन आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

भंगार साहित्यात आलेले दागिने केले परत
ऐतवडे बुद्रुक : आजकाल प्रामाणिकपणा लोप पावत चालला आहे. काही धंदेवाल्यांना तर लबाडीचा शिक्का घेऊनच फिरावे लागते. परंतु चिकुर्डे (ता. वाळवा) येथील विक्रम दत्तू शिंदे या भंगार व्यापाऱ्याने भंगारात सापडलेले सहा तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने प्रामाणिकपणे परत देऊन आजही समाजात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
विक्रम दत्तू शिंदे हे चिकुर्डे व परिसरात गेली दहा वर्षे भंगार व रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय करत आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांनी गावातीलच उदय तेली यांचे लोखंडी कपाट भंगार म्हणून खरेदी केले. घरी नेऊन ते फोडत असताना आतल्या लॉकरमध्ये विक्रम यांना स्टीलचा डबा सापडला.
डबा उघडून बघितला असता त्यामध्ये कोल्हापुरी साज, गळ्यातील हार, छल्ला असे सुमारे सहा तोळ्याचे सोन्याचे व चांदीचे दागिने सापडले. हा ऐवज मिळताच तातडीने विक्रम यांनी उदय तेली यांच्याशी संपर्क साधला व प्रामाणिकपणे हे दागिने त्यांना परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, शिवसेनेचे अभिजित पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.