सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेत जयंत पाटील गटाला धक्का, तीन रिक्त जागेवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 19:27 IST2025-07-19T19:27:41+5:302025-07-19T19:27:57+5:30

सांगलीत सभा : सम्राट महाडिक, पृथ्वीराज पवार, मारुती गायकवाड यांची निवड

Jayant Patil group suffers setback in Sangli District Cricket Association, BJP office bearers elected to three vacant posts | सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेत जयंत पाटील गटाला धक्का, तीन रिक्त जागेवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड

सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेत जयंत पाटील गटाला धक्का, तीन रिक्त जागेवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड

सांगली : सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या गटाला धक्का दिला. संघटनेच्या तीन रिक्त जागांवर भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार आणि मारुती गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव रवींद्र बिनीवाले यांनी बोलवलेली सभा टिळक स्मारक मंदिरात शुक्रवारी सायंकाळी झाली. जयंत टिकेकर सभेच्या अध्यक्षस्थानी होती. संघटनेचे सदस्य जयंत टिकेकर, अनिल जोब, संजीव शाळगावकर, रवींद्र बिनीवाले आणि सुधीर सिंहासने उपस्थित होते. सभेसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, पृथ्वीराज पवार समर्थकांसह क्रिकेटप्रेमी, खेळाडू, पंच, प्रशिक्षक आदींनी गर्दी केली होती.

सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर रिक्त झालेल्या तीन जागांवर सम्राट महाडिक, पृथ्वीराज पवार आणि मारुती गायकवाड यांच्या निवडीचा ठराव मांडण्यात आला. उपस्थित पाचही जणांनी एकमताने संमती दिली. सभेसाठी तीन सदस्य गैरहजर होते. त्याची नोंद करत बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. निवडीबद्दल टाळ्यांचा कडकडाट करून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

यावेळी सम्राट महाडिक म्हणाले, आम्हाला जिल्ह्यातील क्रिकेट पुढे न्यायचे आहे. नवीन निवडीनंतर थांबलेल्या क्रिकेटला चांगली दिशा मिळेल. तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असे काम करू. कुठेही कमी पडणार नाही. राष्ट्रीय पातळीवर खेळाडू जातील असे काम करू. कोणतीही गटबाजी करणार नाही. सध्या समितीत असलेल्या कोणाला बाहेर काढणार नाही. खेळाडूंचे कल्याण करणे, संघटना वाढवणे यासाठी सोबत घेऊन काम करू. काही समज-गैरसमज असतील तर चर्चा करावी. मात्र त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गप्प बसणार नाही.

यावेळी पृथ्वीराज पवार, संजीव शाळगावकर, जयंत टिकेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सभेसाठी सुशील हडदरे, अभिजित कदम, योगेश पवार, उदय पाटील, राकेश उबाळे, माजी नगरसेवक विनायक सिंहासने आदींसह पंच, प्रशिक्षक, क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

अध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची निवड होण्याची शक्यता

गुरुवारी झालेल्या सभेसाठी पाच सदस्य उपस्थित आहेत. रिक्त असणाऱ्या तीन जागांवर सम्राट महाडिक, पृथ्वीराज पवार व मारुती गायकवाड यांची बहुमताने निवड केली आहे. आता पदाधिकारी निवडीसाठी २७ जुलैला बैठक होईल. या बैठकीत अध्यक्षपदासाठी सम्राट महाडिक यांची निवड निश्चित मानले जाते.

दुसऱ्या गटाच्या सभेत पदाधिकारी जाहीर

सांगली जिल्हा क्रिकेट संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला असताना आमदार जयंत पाटील गटातील संजय बजाज यांची अध्यक्षपदी, चंद्रकांत पवार यांची कार्याध्यक्षपदी, तर सचिवपदी माजी महापौर किशोर शहा यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. या गटाच्या बैठकीस राहुल पवार, शेडजी मोहिते, मुश्ताकअली रंगरेज, शहाजी भोसले, युसूफ जमादार, राहुल आरवाडे, महालिंग हेगडे, रितेश कोठारी, अमित फारणे, विजय वावरे, गणेश कुकडे, सागर कोरे, धनंजय डुबल, सुमित चव्हाण, प्रशांत पाटील, कपिल गस्ते, सुनील कवठेकर, विजय शिंदे, प्रशांत कोरे, विशालदीप जाधव, संतोष कोळी, एस. एच. शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Jayant Patil group suffers setback in Sangli District Cricket Association, BJP office bearers elected to three vacant posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.