जयंत पाटील आमचा 'करेक्ट कार्यक्रम' करु शकतात; विशाल पाटील असं का म्हणाले.. जाणून घ्या यामागचं राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:47 IST2025-09-23T13:43:34+5:302025-09-23T13:47:47+5:30
दादा-बापू वाद संपवला

जयंत पाटील आमचा 'करेक्ट कार्यक्रम' करु शकतात; विशाल पाटील असं का म्हणाले.. जाणून घ्या यामागचं राजकारण
सांगली : जयंत पाटील हे कधीतरी आमचा करेक्ट कार्यक्रम करणार हे माहिती आहे; पण आपला पुरोगामी विचार जपण्यासाठी, महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा जपण्यासाठी आम्हाला एकत्र काम करावेच लागणार आहे, अशी स्पष्टोक्ती खासदार विशाल पाटील यांनी केली. सांगलीत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) पुढाकाराने आयोजित महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चानंतर स्टेशन चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
खासदार पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष खूप पहिला. पण तो संघर्ष वैचारिक होता. आमच्यात तो अजूनही कायम आहे. आमची तिसरी पिढी आली तरी आम्ही लढतोय हे नाकारणार नाही. माझ्या मनात कदाचित जयंत पाटील यांच्याबद्दल प्रेम नसेल; पण दादा - बापू वाद आम्ही संपवला आहे. राजकीय शत्रू म्हणून आम्ही जयंत पाटील यांच्याकडे पाहतो. आमचे राजकारण सुरूच राहणार आहे.
वाचा - महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र
खासदार पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, त्यांनी पुरोगामीपणाची अनेक भाषणे केली. महापुरुषांचे कौतुक केले. पण, आमदार झाल्यावर त्यांनी पुरोगामी भूमिकेपासून यू टर्न घेतला. त्यांनी आमच्याबद्दल काहीही बोलावे; पण वसंतदादानी राज्यासाठी, सांगली जिल्ह्यासाठी काय केले हे विचारणे योग्य नाही. त्यांच्या वक्तव्याचा मला राग आला. पण, त्यांच्यामागे कोण आहे, हे महत्त्वाचे आहे. साडेआठ वर्षे मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांना राज्यासाठी धोरण आणता आले नाही. म्हणून अशा पाळलेल्या लोकांकडून ते बोलून घेत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोणीही सुसंस्कृत म्हणणार नाही.