लोकमत न्यूज नेटवर्क
जत : शहरातील प्रमुख रस्ते व चौकातील रस्त्यांवरच भाजीपाला बाजार भरत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास ग्रामीण भागातून जतमध्ये आलेल्या नागरिक व व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे शहरात स्वतंत्र भाजी मंडई उभारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
जत शहराची लोकसंख्या सुमारे पन्नास हजार आहे. शहरासाठी स्वतंत्र भाजी मंडईची व्यवस्था नाही. तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने मंडई निर्माण केली होती. परंतु ती अपुरी व गैरसोयीच्या ठिकाणी असल्यामुळे तेथे भाजीविक्रेता बसत नाही. सध्या रस्त्यावरच भाजीपाला बाजार भरत आहे. त्यामुळे धुळीचा त्रास सर्वांना सहन करावा लागत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही ठिकाणी गटारीच्या बाजूला बसूनच भाजी विक्री व्यवसाय केला जातो. शहरातील प्रमुख चौकात अवैध रिक्षा थांबे आहेत. वाहनांची वाढती संख्या, मुख्य चौकातील हातगाडी, फेरीवाले, भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण, दुकानदारांनी दुकानासमोर रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेले साहित्य आणि अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे शहरात वरचेवर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. जत नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलीस एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळत आहेत.
चौकट
सहकार्य करणार
जत शहरातील वाहतुकीच्या व भाजीपाला मार्केटच्या प्रश्नावर प्रशासनाने सर्वपक्षीय बैठक घेऊन त्वरित निर्णय घ्यावा. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत, असे मत जत नगरपालिकेतील विरोधी गटनेते विजय ताड यांनी व्यक्त केली आहे.
चौकट
अतिक्रमण काढा
जत शहराच्या मध्यवर्ती भागातून विजापूर ते गुहागर राज्यमार्ग जातो. रस्त्याच्या लगत असलेल्या गटारीवर आतापासूनच व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. भविष्यात हे अतिक्रमण अपघाताला आमंत्रण देणारे आहे. हे अतिक्रमण काढून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी केले आहे.
कोट
रस्त्यावर भाजीपाला विक्री करणे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. भाजीपाल्यावर धुळीचे कण व इतर विषाणू बसून तो दूषित होतो आहे. यासाठी स्वतंत्र भाजीपाला मार्केट असणे आवश्यक आहे.
- डॉ. संजय बंडगर, जत तालुका आरोग्य अधिकारी
फोटो-१०जत१ २ व ३