टर्मरिक सिटी गुलाबी नगरी जयपूरला जोडणार; जयपूर-म्हैसूर विशेष एक्स्प्रेस सांगलीमार्गे धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:44 IST2025-10-18T17:42:37+5:302025-10-18T17:44:32+5:30
सांगलीतून बुकिंग करण्याचे आवाहन

टर्मरिक सिटी गुलाबी नगरी जयपूरला जोडणार; जयपूर-म्हैसूर विशेष एक्स्प्रेस सांगलीमार्गे धावणार
सांगली : देशाची टर्मरिक सिटी असलेल्या सांगलीला राजस्थानची राजधानी आणि गुलाबी नगरी जयपूर, भारताची सिलिकॉन व्हॅली बंगळुरू आणि राजवाड्यांचे शहर असलेल्या म्हैसूरला विशेष रेल्वेने जोडले जाणार आहे. म्हैसूर-जयपूर विशेष ट्रेन शनिवारपासून (दि. १८) सांगली स्थानकावरून धावणार आहे.
राजस्थानच्या लोकांना महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ये-जा करण्यासाठी रेल्वेची मागणी अनेक वर्षांपासून होती. राजस्थानच्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्रातील सांगली भागात हळद, गूळ, बेदाणा व्यापारासाठी ये-जा करावे लागते.
नव्या विशेष रेल्वेमुळे प्रवाशांसाठी राजस्थानहून सांगलीला येणे सोपे होईल. बंगळुरू, जयपूरहून येणाऱ्या प्रवाशांचीही सोय यामुळे होणार आहे. भारतीय रेल्वेने दिवाळीच्या काळात म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस आणि जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस बंगळुरू-सांगली मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आणि तिकीट विक्री चांगली झाली तर भविष्यात ही गाडी नियमित एक्स्प्रेस म्हणून चालविली जाईल. ही गाडी जयपूरला कर्नाटकमधील बेळगावी, हुबळी-धारवाड, दावणगिरी, आरसीकेरी, तुमको या भागांशी जोडली जाईल.
म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस (क्र. ०६२३१) अशी धावणार
- १८ ऑक्टोबर, २५ ऑक्टोबर
- म्हैसूर : शनिवार रात्री ११:५५
- बंगळुरू : रविवारी मध्यरात्री २:१०
- हुबळी : रविवारी सकाळी ९:४०
- सांगली : रविवार दुपारी ३:४५
- वडोदरा : सोमवार सकाळी ५:४५
- अहमदाबाद : सकाळी ७ :२०
- आबू रोड : सोमवार सकाळी ११:२५
- फालना : सोमवार दुपारी १२:५०
- जयपूर : सोमवार सायंकाळी ६:४०
जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस (क्र.०६२३२) अशी धावणार
- २१ ऑक्टोबर व २८ ऑक्टोबर
- जयपूर : सकाळी ४ वाजता प्रस्थान
- फालना : मंगळवार सकाळी ८:५५
- आबू रोड : मंगळवार सकाळी १०:१५
- साबरमती (अहमदाबाद) : मंगळवार दुपारी १:२०
- वडोदरा : मंगळवार दुपारी ४:५२
- सांगली : बुधवार सकाळी ७:१८
- हुबळी : बुधवार दुपारी २:२०
- बंगळुरू : बुधवार रात्री ११:४०
- मैसूर : गुरुवार सकाळी ३:३०
सांगलीतून बुकिंग करण्याचे आवाहन
जयपूरहून सांगली, हुबळी, बंगळुरू, म्हैसूरकडे जाण्यासाठी किंवा परतीच्या प्रवासाचे तिकीट आयआरसीटीसी संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲप्लिकेशनवरून बुक करावे. सांगलीतून जाणाऱ्या व सांगलीत येणाऱ्या प्रवाशांनी सांगली स्थानकाचा उल्लेख बुकिंग करताना करावा, असे आवाहन येथील प्रवासी संघटनांनी केले आहे.