आधी लाथ आणि मग साॅरी, असे चालणार नाही; चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:35 IST2025-09-29T14:34:39+5:302025-09-29T14:35:27+5:30
इशारा सभा ऑनलाइन घेणार

आधी लाथ आणि मग साॅरी, असे चालणार नाही; चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सुनावले
सांगली : सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सभेत नेत्यांनी लांबलचक भाषणे केली. तुम्ही आमच्या नेतृत्वावर काहीही बोलायचे आणि नंतर साॅरी म्हणायचे, असे चालणार नाही, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी आमदार जयंत पाटील यांना सुनावले. राष्ट्रवादीच्या वाचाळवीर नेत्यांच्या १३३ क्लीप आमच्या हाती लागल्या आहेत. इशारा सभेत त्या स्क्रीनवर दाखविणार, असा इशाराही दिला.
पालकमंत्री पाटील हे रविवारी सांगली दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सांगलीत इशारा सभा घ्यायची आमची ठाम भूमिका आहे; पण राज्यात सध्या पावसाने कहर माजवला आहे. शेतकरी अडचणीत आहेत, मराठवाडा-विदर्भात नैसर्गिक आपत्तीचे संकट गडद झाले आहे. अशा वेळी सभेचे स्वरूप बदलता येईल का, यावर गंभीर चर्चा सुरू आहे. सभा ऑनलाइन घेण्याचा विचार आहे.
२०१९च्या महापुरावेळी भाजप-युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही, त्यावेळी जशी मदत दिली तशीच यावेळीही केली जाणार, असे पाटील म्हणाले.
फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहावे
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ते उत्तम संघटक आहेत, बुद्धिमान नेते आहेत. त्यांनी २०२९ पर्यंत महाराष्ट्रात राहावे, ही इच्छा चुकीची नाही. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राला पर्याय नव्हे तर प्रश्न सोडविणारे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळेच फडणवीस महाराष्ट्रात राहणे, हेच योग्य ठरेल. फडणवीस यांना माहीत आहे, आपण इच्छा व्यक्त करायची असते. शेवटी नेतृत्वाने योग्य-अयोग्यचा निर्णय करायचा असतो.