'अलमट्टी'प्रश्नी मुख्यमंत्र्यांचे पत्र स्वागतार्ह; पण..; कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:03 IST2025-08-02T19:02:30+5:302025-08-02T19:03:18+5:30
अलमट्टी उंचीवाढीचा सातत्याने विरोध करा

'अलमट्टी'प्रश्नी मुख्यमंत्र्यांचे पत्र स्वागतार्ह; पण..; कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे आवाहन
सांगली : अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री सी. आर. पाटील यांना पाठवले, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, केवळ पत्र पाठवून भागणार नाही, सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे, असे आवाहन कृष्णा महापूर नियंत्रण नगरी कृती समितीने केले आहे.
समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, अंकुश आंदोलन व समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढविरोधात केंद्र शासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यापूर्वीच कर्नाटकच्या भूमिकेचा निषेध करायला हवा होता, असेही ते म्हणाले.
कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आधीही अनेक पत्रव्यवहार निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे यावेळी केंद्र सरकारकडे ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. दोन्ही राज्यांची तातडीची बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.
गाडगीळ, खाडे यांनीही पाठपुरावा करावा
अलमट्टी धरणाची उंची वाढीविरोधात खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, डॉ. विश्वजीत कदम यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. असे असले तरी सत्तारूढ आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनीही यामध्ये आता गंभीर लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी सर्जेराव पाटील यांनी केली आहे.