Sangli: विट्यातील एमडी ड्रग्जचा तपास ‘एलसीबी’कडे, मुंबई कनेक्शन तपासणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:43 IST2025-01-31T15:42:43+5:302025-01-31T15:43:05+5:30
प्रकरणाची व्याप्ती पाहून अधीक्षकांचा निर्णय

Sangli: विट्यातील एमडी ड्रग्जचा तपास ‘एलसीबी’कडे, मुंबई कनेक्शन तपासणार
सांगली : विटा शहराजवळ असलेल्या कार्वे औद्योगिक वसाहतीत मेफॅड्रॉन (एमडी) ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) पथकाने छापा टाकला होता. याचा प्रारंभिक तपास विटा पोलिस ठाण्याकडे होता; परंतु या प्रकरणाची व्याप्ती पाहून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी ‘एलसीबी’कडे याचा तपास सोपवला आहे.
कार्वे (ता. खानापूर) येथील औद्योगिक वसाहतीमधून एमडी ड्रग्ज मुंबईला विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी रामकृष्ण हरी माउली इंडस्ट्रीजमधून बाहेर पडलेली मोटार अडवून चौकशी केली. तेव्हा चालकाच्या बाजूला बसलेल्या बलराज कातारी (रा. आयटीआय कॉलेजजवळ, विटा) याने उडवाउडवीची उत्तरे दिली. झडतीमध्ये त्याच्या सॅकमधून १४ किलो ८०६ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज पोलिसांना सापडले. पोलिसांनी कारखान्यात छापा टाकला. तेथे राहुदीप बोरिचा (रा. सुरत, गुजरात) व सुलेमान शेख (रा. बांद्रा, मुंबई) याला ताब्यात घेतले. कारखान्यात एमडी बनवून मुंबईत विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली त्याने दिली.
विटा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. विटा पोलिस याचा तपास करत होते. संशयित तिघे जण सध्या पोलिस कोठडीत आहेत. एमडी ड्रग्ज तस्करीचे मुंबई कनेक्शन तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने कार्वेतील कारवाईनंतर तत्काळ मुंबई गाठून या साखळीतील संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एमडी ड्रग्जच्या तस्करीची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विटा पोलिसांना तपासात येणाऱ्या मर्यादा व तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन एलसीबीकडे हा तपास सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी गुरुवारी तपासाची सूत्रे हाती घेतली. विटा पोलिस ठाण्यात असलेल्या संशयितांना आता सांगलीत आणून तपास केला जाणार आहे.
मुंबई कनेक्शन तपासणार
कार्वे येथील कारखान्यावरील छाप्यात पकडलेला राहुदीप बोरिचा हा गुजरातेतील असून, दुसरा संशयित सुलेमान शेख हा मुंबईतील बांद्र्याचा आहे. त्यामुळे एमडी तस्करीचे गुजरात आणि मुंबई कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक तपासात मुंबईशी असलेले कनेक्शन तपासण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
तपासाकडे लक्ष
एमडी ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळेच एलसीबीकडे तपास सोपवला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष लागले आहे. एमडी ड्रग्जचे कनेक्शन कुठपर्यंत गेले आहे? विट्यातून कोठे माल पाठवला गेला? आणखी किती जणांचा या साखळीत सहभाग आहे? याची उत्सुकता ताणली आहे.