Sangli: विट्यातील आगीच्या कारणांचा शोध, ऊर्जा विभागाच्या पथकाकडून इमारतीची तपासणी; आगीत चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:07 IST2025-11-12T16:07:31+5:302025-11-12T16:07:48+5:30
लवकरच अहवाल सादर होणार

Sangli: विट्यातील आगीच्या कारणांचा शोध, ऊर्जा विभागाच्या पथकाकडून इमारतीची तपासणी; आगीत चौघांचा मृत्यू
विटा : विटा येथील जय हनुमान स्टील आणि फर्निचर दुकानाला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ही आग कशामुळे लागली, याची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा व कामगार विभागाचे पथक मंगळवारी दुपारी विट्यात दाखल झाले. पथकाने जळीत इमारतीची तपासणी करून जळून खाक झालेली विद्युत उपकरणे व अन्य इलेक्ट्रिक साहित्याची पाहणी केली.
विटा येथील भांडी दुकानाला सोमवारी भीषण आग लागून विष्णू जोशी, त्यांची पत्नी सुनंदा, मुलगी प्रियांका व दोन वर्षांची चिमुकली नात सृष्टी यांचा मृत्यू झाला होता. ही आग कशामुळे लागली, याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अनेकांनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर काहींनी दुकानातील फ्रीजच्या काॅम्प्रेसर स्फोटामुळे आग लागल्याचा निष्कर्ष काढला होता.
या घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. घरातील लोकांना बाहेर पडता आले नसल्याने चिमुरडीसह चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळेही आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी मिरज येथील शासनाच्या ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षक संजय राठोड, सहायक अभियंता अभिजित रजपूत यांच्यासह पथकाने जोशी यांच्या घरी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत विटा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह महावितरणचे अधिकारी होते.
पथकाने घरातील सर्व विद्युत उपकरणे आणि वायरिंगची पाहणी केली. मात्र, या भीषण आगीत विद्युत फिटिंग, वायरिंगसह सर्व साहित्य जळून खाक झाल्याने पथकाला मोठी अडचण झाली. त्यानंतर या पथकाने प्रत्यक्षदर्शी लोकांचे जबाब नोंदविले. त्यावेळी लोकांनी शॉर्टसर्किटमुळेच ही लागल्याचे पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याबाबतच सर्व जबाब नोंदवून घेतले.
तपासणीत अडथळे
विटा येथे इमारतीला लागलेली आग भीषण होती. आमच्या पथकाने सर्व तपासणी केली; परंतु वायरिंगसह सर्व साहित्य जळून खाक झाल्याने ही आग कशामुळे लागली, याचा अंदाज येत नाही. घरातील लोकांकडून विद्युत उपकरणांची माहिती घ्यावी लागेल; पण सध्या घरातील सदस्य बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याने आठवडाभरात त्यांच्याशी बोलून योग्य व वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला जाईल, असे मत विद्युत निरीक्षक संजय राठोड यांनी व्यक्त केले.