Sangli- विनयभंग प्रकरण: सनमडीतील आश्रमशाळेची चौकशी सुरु, मुख्याध्यापकास ३ दिवस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:46 IST2025-04-28T16:46:13+5:302025-04-28T16:46:50+5:30
दरीबडची : सनमडी (ता. जत) येथील महात्मा जोतिबा फुले प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक विनोद परसू जगधने (वय ५२, रा. विठ्ठल ...

Sangli- विनयभंग प्रकरण: सनमडीतील आश्रमशाळेची चौकशी सुरु, मुख्याध्यापकास ३ दिवस कोठडी
दरीबडची : सनमडी (ता. जत) येथील महात्मा जोतिबा फुले प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक विनोद परसू जगधने (वय ५२, रा. विठ्ठल नगर, जत) याच्यावर उमदी पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालायत हजर केले असता पोक्सोअंतर्गत तीन दिवसांची काेठडी देण्यात आलेली आहे.
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी रात्री दिली होती. ही घटना रविवारी दि १८ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापकांच्या केबीनमध्ये घडली होती. त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी मुख्याध्यापकास न्यायालयात हजर केले. मुख्याध्यापक विनोद जगधने हा सनमडी येथील महात्मा फुले प्राथमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक आहे.
पीडित मुलगी नववीच्या वर्गात शिकत आहे. मुख्याध्यापक जगधने यांनी मुलीला केबिनमध्ये येण्यास सांगितले. मुलगी घाबरून आली नाही. येत नसल्याचे पाहून तिला ओढून ऑफिसमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने तिचा विनयभंग केला. मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य केले. पीडित मुलीला तू कोणाला काही सांगू नको. नाहीतर तुला मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
वार्षिक परीक्षा संपल्यावर सुट्टी लागल्याने जगधने, महिला शिक्षिका, शिपाई बुधवारी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीस घरी सोडण्यासाठी गेले होते. पीडित मुलींनी शाळेत झालेल्या घटनेची माहिती पालकांना सांगितली होती. कुटुंबीयांनी अत्याचाराबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यास बेदम चोप दिला. घटनास्थळावरून शिक्षिका व शिपाई पळून गेले. याची दखल घेत शुक्रवारी आश्रमशाळेस मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनश्री भांबुरे यांनी तातडीने भेट दिली. शिक्षकांचे जबाब घेतले. उमदी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या पालकांनी फिर्यादी दिली.
संशयित आरोपी विनोद जगदने याला शनिवारी अटक केली. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस-२०२३ च्या कलम ७५, ७६, ३५१(२), व पोक्सोअंतर्गत कलम ८,१०,१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
मान्यता नसताना विद्यार्थिनी निवासी
प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांनी, आठवी ते दहावीच्या वर्गाची मान्यता नसताना विद्यार्थिनी निवासी कशा ठेवल्या, याबाबत विचारणा संचालिका धनश्री भांबुरे यांना केली. यावेळी त्यांनी, असे करता येत नसल्याचे सांगितले.
संपर्क साधण्याचे पालकांना आवाहन
पोलिसात तक्रार देण्यास अजूनही काही पालक धजावत नाहीत. असा काही प्रकार कुणाच्याही पाल्याबाबत घडला असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांनी केले आहे.