तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 23:46 IST2025-09-29T23:44:52+5:302025-09-29T23:46:04+5:30
संशयित जुळेवाडीचा, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीसह कर्नाटकात दुचाकी चोरणाऱ्या फिरोज नबीलाल मुल्ला (वय ३१, रा. मानुगडे गल्ली, जुळेवाडी, ता. तासगाव) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २१ दुचाकी, एक मोटार असा १६ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
जुळेवाडी येथील फिरोज मुल्ला याने तीन-चार महिन्यापासून दुचाकी चोरण्याचा सपाटाच लावला होता. एसटीमधून कोठेही जायचा. तेथून येताना दुचाकी चोरून घेऊन यायचा. त्यानंतर दहा ते पंधरा हजार रूपयांना दुचाकी वापरण्यास देत होता. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगलीसह कर्नाटकातील विजयपूर येथून त्याने दुचाकी चोरल्या होत्या. तरीही तो पोलिसांना सापडला नव्हता.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील मच्छिंद्र बर्डे, सतीश माने यांना जुळेवाडी येथील फिरोज मुल्ला याने काही दुचाकी चोरल्या असल्याची माहिती मिळाली. तो पाचवा मैल येथे दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. काहीवेळाने तो आल्यानंतर संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर चाव्यांचा जुडगा आढळून आला. चाव्याबाबत विचारणा करून त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने कुपवाड एमआयडीसी येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच गेल्या चार महिन्यात गांधीनगर, रेल्वे स्थानक, मलकापूर, कराड, कुपवाड, मिरज, कासेगाव, पंढरपूर तसेच कर्नाटकातील विजयपूर येथून दुचाकी चोरल्याचे सांगितले.
पोलिस पथकाने त्याच्याकडून २१ दुचाकी आणि एक मोटार असा १६ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला कुपवाडमधील चोरीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पवार, कर्मचारी सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, सागर टिंगरे, संदीप नलवडे, अमिरशा फकीर, संदीप गुरव, अनिल कोळेकर, अमर नरळे, उदयसिंह माळी, महादेव नागणे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, गणेश शिंदे, अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बसने जाऊन चोरी
फिरोज मुल्ला याने चार महिन्यापासून दुचाकी चोरण्यास सुरूवात केली होती. चोरी करण्यासाठी तो कोठेही बसने जात होता. त्याच्याजवळ असलेल्या चाव्यांच्या जुडग्यातून एखादी दुचाकी चोरल्यानंतर ती घेऊन परत येत होता.
दुचाकी गहाण आल्याचे सांगून द्यायचा
फिरोज मुल्ला हा सावकारी करत असल्याचे भासवत होता. त्याच्याकडे दुचाकी गहाण आल्याचे सांगून तो दहा ते पंधरा हजार रूपयात कोणालाही देत होता. त्यामुळे कागदपत्रे, मालकी याबाबत कोणीही विचारणा करत नव्हते. गुन्हे अन्वेषणने त्याला पकडल्यानंतर पहिल्यांदाच तो पोलिस रेकॉर्डवर आला.