मिरज : मिरजेत प्रभाग तीन व चारमधील उमेदवार निवडीवरून भाजपमध्ये संघर्ष आहे. प्रभाग तीनमध्ये माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे व दिगंबर जाधव यांना उमेदवारी दिल्यास वेगळा निर्णय घेण्याचा इशारा ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांनी पक्षाच्या बैठकीत दिला. यामुळे दिगंबर जाधव हे राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वाटेवर आहेत. मिरजेत खासगी फार्महाऊसवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार निवडीसाठी बैठक पार पडली.यावेळी उपस्थित भाजप अंतर्गत गटाच्या महायुतीमधील समाविष्ट पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या समर्थक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी चर्चा केली. यावेळी मिरजेतील प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादीत गेलेले माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांना पुन्हा प्रभाग तीनमध्ये भाजपची उमेदवारी देण्यास आवटी यांनी हरकत घेतली. या प्रभागात आवटी गटाने उमेदवार निश्चित केले असल्याने दुर्वे व दिगंबर जाधव यांच्या मातोश्री माजी नगरसेवक शांता जाधव यांना पॅनलमधून उमेदवारी दिल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ असा पवित्रा सुरेश आवटी यांनी घेतला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोघेही भाजपचे माजी नगरसेवक असून निवडणूक सर्वेक्षणात शिवाजी दुर्वे व शांता जाधव यांची नावे आघाडीवर असल्याने त्यांना उमेदवारी द्यावी लागेल, अशी भूमिका घेतली. यामुळे प्रभाग तीनच्या उमेदवारीवरून बैठकीत वाद झाल्याने दुर्वे व जाधव यांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असा निर्णय घेण्यात आला.प्रभाग चारमध्येही माजी नगरसेवक पांडुरंग कोरे व ठाणेदार यांना आवटी यांनी विरोध केला आहे. दोन्ही प्रभागांत आम्ही निश्चित केलेल्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास स्वतंत्र आघाडीतर्फे निवडणूक लढविणार असल्याच्या इशारा सुरेश आवटी यांनी दिल्याने भाजप बॅकफूटवर आहे. आमदार सुरेश खाडे यांनीही सुरेश आवटी यांचे समर्थन केल्याने प्रभाग तीनमधून दिगंबर जाधव यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यामुळे दिगंबर जाधव यांनी लगेचच राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते माजी महापौर किशोर जामदार यांची भेट घेतली. पक्षाने उमेदवारी नाकारल्यास प्रभाग तीनमधून राष्ट्रवादीतर्फे उभे राहणार असल्याचे जाधव यांनी जाहीर केले. भाजपचे दोन माजी नगरसेवक राष्ट्रवादीतून मैदानात उतरल्यास प्रभाग तीनमध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. बैठकीस जयश्रीताई पाटील, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, दिनकर पाटील, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, प्रकाश ढंग, दीपकबाबा शिंदे उपस्थित होते.मिरजेत आवटी गटाने आधीच उमेदवार ठरवलेत्यांना उमेदवारी न मिळाल्यास स्वतंत्र आघाडीचा इशारा देत भाजपवर दबाव वाढवला आहे. आमदार सुरेश खाडे हे आवटी गटासोबत आहेत, मात्र पालकमंत्री पाटील वेगळे मत मांडत आहेत. मात्र पक्षातील या गटबाजीमुळे तिकीट वाटपाचा ताण वाढला आहे. उमेदवारीच्या वादात भाजपमधील नाराज नेत्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीचा फायदा होणार आहे.
Web Summary : Sangli BJP faces turmoil over Miraj election candidates. Awati faction threatens separate front if their candidates are denied, potentially benefiting NCP.
Web Summary : सांगली बीजेपी मिराज चुनाव उम्मीदवारों पर संकट का सामना कर रही है। आवटी गुट ने उम्मीदवारों को इनकार करने पर अलग मोर्चे की धमकी दी, जिससे एनसीपी को फायदा हो सकता है।