Sangli Municipal Election 2026: भाजपसोबत युती न झाल्यास महायुतीला फटका बसेल - शंभुराजे देसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:21 IST2025-12-18T15:21:15+5:302025-12-18T15:21:49+5:30
शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण

Sangli Municipal Election 2026: भाजपसोबत युती न झाल्यास महायुतीला फटका बसेल - शंभुराजे देसाई
सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसोबत महायुतीसाठी आमचे प्रयत्न आहेत. पालकमंत्र्यांंशी चर्चा सुरू आहेत. दोन दिवसांत बैठक होईल, जागा वाटपात भाजपने मान-सन्मान दिला तर घेऊ, अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढविणार आहोत. भाजपने शिवसेनेबरोबर युती न केल्यास महायुतीलाच फटका बसेल, असे पर्यटनराज्यमंत्री तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई सांगलीत आले होते. त्यांनी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीसाठी आमचा प्रयत्न आहे. भाजपबरोबर प्राथमिक चर्चा झाली आहे. पुढील चर्चा येत्या काही दिवसांत होईल. याची जबाबदारी आमदार सुहास बाबर यांच्यावर दिली आहे.
महायुतीमध्ये शिवसेनेला योग्य वाटा मिळायला हवा. भाजपने मान-सन्मान दिला तर महायुती होईल, अन्यथा शिवसेनेकडे १७५ जण इच्छुक आहेत. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. इच्छुकांना प्रथम पक्षाचे काम, चिन्ह जनतेपर्यंत पोहचवा, अशा सूचना दिल्या आहेत, असा देसाई यांनी स्पष्ट केले.
चव्हाण मंत्री असताना वायूदलाचा पराभव झाला असेल?
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारतीय वायूदलाचा पूर्णपणे पराभव झाला होता, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यावर देसाई म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी अशी घटना ते केंद्रात मंत्री होते, त्या वेळची सांगितली असेल, पण सध्या झालेले ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीचे नुकसान नाही
खासदार संजय राऊत आता बरे होऊन घरी आले आहेत. ते पुन्हा काही तरी बरळू लागले आहेत. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव व राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीला नुकसान नसल्याचेही देसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.