Sangli Crime: मुलगी झाली, घरी आली तर मी फास लावून घेईन; पतीने पत्नीला दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:21 IST2025-04-08T18:20:54+5:302025-04-08T18:21:11+5:30
सासरच्या तिघांविरुद्ध विट्यात गुन्हा

Sangli Crime: मुलगी झाली, घरी आली तर मी फास लावून घेईन; पतीने पत्नीला दिली धमकी
विटा : मुलगी झाली, पण तू घरी आली तर मी फास लावून घेईन व तुम्हा सर्वांना कायद्याच्या कचाट्यात अडकवीन, अशी धमकी देत वडिलाकडून २० तोळे सोने घेऊन ये, असे सांगून विवाहिता कोमल विशाल सावंत (वय २८, रा. मसुचीवाडी, ता. वाळवा, सध्या रा. कार्वे, ता. खानापूर) हिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विशाल धोंडीराम सावंत, सासू संगीता धोंडीराम सावंत व दीर वैभव धोंडीराम सावंत (सर्व रा. मसुचीवाडी, ता. वाळवा) या तिघांविरुद्ध विटा पोलिसांत दि. ७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
कार्वे येथील कोमल हिचा विवाह मसुचीवाडी येथील विशाल सावंत याच्याशी झाला होता. विवाहानंतर दि. ३ मे २०२३ ते २ मे २०२४ या कालावधीत विवाहिता कोमल हिचा सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. संशयित पती, सासू व दीर यांनी संगनमताने घराचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कोमल हिला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले.
त्यास तिने नकार दिल्यानंतर तिच्या परस्पर तिचे सोन्याचे दागिने बॅँकेत गहाण ठेवले. ते त्यांनी परत आणून दिले नाहीत. विवाहिता कोमल हिने माझे सोन्याचे दागिने बॅँकेतून परत आणा, असे सांगिल्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन वडिलांकडून २० तोळे सोने आण आणि ते त्यांच्याकडून घेतल्याशिवाय नांदायला येऊ नको, अशी धमकी दिली.
त्यादरम्यान कोमल हिला मुलगी झाली. ही बातमी मसुचीवाडीतील सासरच्या मंडळींना दिल्यानंतर पती विशाल सावंत याने तुला मुलगी झाली आहे, तू माझ्या घरी आलीस तर मी फास लावून घेईन व तुम्हा सर्वांना कायद्याच्या कचाट्यात अडकवीन, अशी पुन्हा धमकी देऊन तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहिता कोमल सावंत हिने सोमवारी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पती विशाल सावंत, सासू संगीता सावंत व दीर वैभव सावंत या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४९८ (अ), ५०४, ५०६, व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.