सांगलीत महिला पोलिसाच्या पतीची आत्महत्या, गळफास घेवून संपवली जीवनयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:57 IST2022-02-09T18:30:41+5:302022-02-09T18:57:38+5:30
व्यायामाला जातो असे सांगून घरातून पडले होते बाहेर

सांगलीत महिला पोलिसाच्या पतीची आत्महत्या, गळफास घेवून संपवली जीवनयात्रा
सांगली : शहरातील यशवंतनगर येथे महिला पोलिसाच्या पतीने लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र शहाजी पाटील (वय ३८, मूळ गाव बेडग, ता. मिरज, सध्या रा. यशवंतनगर, सांगली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संजयनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आहे.
याबाबत माहिती अशी की, मृत पाटील मूळचे बेडगमधील होते. गावातच त्यांचा दूध संकलनाचा व्यवसाय होता, तर त्यांच्या पत्नी संजयनगर पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत. पाटील सध्या यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राच्या पाठीमागे भाड्याने घर घेऊन राहत होते. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ते व्यायामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले.
त्यानंतर त्यांनी नॉयलॉन दोरीच्या साहाय्याने लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. खूप वेळ झाला तरी ते घरी परतले नसल्याने त्यांचे मेहुणे सचिन पवार त्यांना शोधण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांना पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.