Sangli Crime: बांधकाम कामगाराकडे का बघतेस, संतप्त पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:05 IST2023-06-01T13:05:09+5:302023-06-01T13:05:27+5:30
विटा पोलिसांत गुन्हा दाखल

Sangli Crime: बांधकाम कामगाराकडे का बघतेस, संतप्त पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला
विटा : घरासमोर सुरू असलेल्या घर बांधकामावरील कामगाराकडे का बघतेस, असा जाब विचारून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना गावठाण भेंडवडे (ता. खानापूर) येथील शेतात घडली. भारती विठ्ठल जानकर (वय ३१, रा. गावठाण भेंडवडे) जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित पती विठ्ठल अरुण जानकर याच्याविरुद्ध बुधवारी दुपारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
गावठाण भेंडवडे येथील विठ्ठल जानकर याच्या घरासमोर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर कामगार काम करीत आहेत. या कामगाराकडे पत्नी भारती ही नेहमी जाता-येता बघत होती, असा संशय पतीला होता. मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता विठ्ठल हा पत्नी भारती हिला घेऊन वरचे माळ नावाच्या शेतात गेला.
त्याठिकाणी गेल्यानंतर पत्नी भारती हिला ‘तू नेहमी बांधकामावर असलेल्या कामगाराकडे का बघतेस’ असा जाब विचारला. त्यावेळी दोघांत वाद सुरू झाला. या वादाच्या रागातून पती विठ्ठल याने वैरण काढण्यास आणलेल्या कोयत्याने पत्नी भारती हिच्यावर हल्ला चढविला.
या हल्ल्यात भारती हिच्या उजव्या हाताच्या कोपरावर वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर खाजगी रुग्णायलयात उपचार करण्यात आले. बुधवारी दुपारी विटा पोलिसांत येऊन पत्नी भारती हिने पती विठ्ठल जानकर याच्याविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार आनंदराव पाटील करीत आहेत.