सांगली जिल्ह्यात १६ मे पासून घरगणनेस प्रारंभ, जनगणना कधी होणार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:34 IST2026-03-19T15:33:18+5:302026-03-19T15:34:48+5:30
पाच हजारांवर प्रगणक नियुक्त : प्रशासन प्रथमच ‘डिजिटल’चा वापर करणार

संग्रहित छाया
सांगली : देशातील सर्वात मोठा प्रशासकीय उपक्रम मानली जाणारी जनगणना आता पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना मोहीम राबविण्यात येणार आहे.
त्यानंतर फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष जनगणना पार पडणार आहे. यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात होणार आहे. यासाठी जिल्ह्यात तब्बल पाच हजार १२४ प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात तहसीलदार, तर शहरी भागात मुख्याधिकारी जनगणना अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. जिल्हाधिकारी हे प्रधान जनगणना अधिकारी, तर निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
जनगणना २०२७ दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना होईल. यादरम्यान प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील. शासनाने निश्चित केलेले ३४ प्रश्न घरातील प्रमुख व्यक्तीकडून विचारून ही माहिती ‘एचएलओ’ ॲपच्या माध्यमातून थेट जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. विशेष म्हणजे, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना census.gov.in/se या संकेतस्थळावर स्वतःहून माहिती भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात १ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी केली जाईल. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली असून, ४ ते ६ मार्च २०२६ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र जनगणना संचालनालयातील सहायक संचालक कविता गोडबोले व प्रणय कुडकर यांनी मार्गदर्शन केले.
पायाभूत सुविधा उभारणीसाठी जनगणना महत्त्वाची
जनगणना ही केवळ आकडेवारी नसून, विकासाचा पाया मानली जाते. लोकसंख्येची सामाजिक, आर्थिक व लोकसंख्याशास्त्रीय माहिती यामधून उपलब्ध होणार आहे. या आकडेवारीच्या आधारे केंद्र व राज्य सरकारांना विकास योजना आखणे, संसाधनांचे योग्य वाटप करणे आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी अचूक नियोजन करणे शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.