सांगली जिल्ह्यात दहा मंडळात अतिवृष्टी; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:43 IST2025-06-14T18:42:58+5:302025-06-14T18:43:14+5:30

ओढे-नाले तुडुंब 

Heavy rains in Sangli district Pomegranate, grape, vegetable crops hit hardest | सांगली जिल्ह्यात दहा मंडळात अतिवृष्टी; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका

सांगली जिल्ह्यात दहा मंडळात अतिवृष्टी; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ३३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. वाळवा, जत, मिरज, पलूस, आटपाडी तालुक्यातील १० मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असून शेतीत पाणी साचून राहिले आहे. डाळिंब, द्राक्ष बागांसह भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती.

मुंबई हवामान विभागाने जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार गुरुवारी जिल्ह्यात धो-धो पाऊस कोसळला आहे. वाळवा तालुक्यातील पेठ, आष्टा, इस्लामपूर आणि कामेरी याठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले होते. दुष्काळी आटपाडी मंडळात ६७ मिलीमीटर तर जत तालुक्यातील उमदी मंडळात चाेवीस तासांत ७४.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. 

पलूस तालुक्यातील पलूस, कुंडल मंडळातही मुसळधार पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचून राहिले होते. या भागात भाजीपाला ही मोठ्या प्रमाणात असून त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. शिराळा तालुक्यात मांगले आणि मिरज तालुक्यातील बेडग मंडळातही धुवाधार पाऊस झाला आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजलेपासून सांगली, मिरज शहरात पावसाने उघडीप दिली होती. जिल्ह्याच्या काही भागामध्येही किरकोळ पावसाने हजेरी लावली.

या मंडळात अतिवृष्टी

शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मिरज तालुक्यातील बेडग मंडळात ६५.३ मिलीमीटर, जत तालुक्यातील उमदी मंडळात ७४.८ मिलीमीटर, वाळवा तालुक्यातील पेठ मंडळात ७०, आष्टा ६५.५, इस्लामपूर ८०.३, कामेरी ७१.५, शिराळा तालुक्यातील मांगले मंडळात ६५., आटपाडी मंडळात ६७ आणि पलूस तालुक्यातील कुंडल ८८ आणि पलूस मंडळात ६७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चाेवीस तासांतील पाऊस
तालुका - पाऊस (मिलीमीटर)

मिरज- २२.८
जत- ३५.७
खानापूर- १५.३
वाळवा- ५२.३
तासगाव- ९.९
शिराळा- ४५.१
आटपाडी- ३१.९
क.महांकाळ- ९.७
पलूस- ५२.४
कडेगाव- ३७.३

Web Title: Heavy rains in Sangli district Pomegranate, grape, vegetable crops hit hardest