अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:10 IST2025-08-27T18:09:47+5:302025-08-27T18:10:58+5:30

शेतकरी संकटाने बेजार झाले

Heavy rains floods hit crops on 4971 hectares in Sangli district | अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू

संग्रहित छाया

सांगली : कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्वप्नच पाण्यात वाहून गेले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल ११ हजार ७५७ शेतकऱ्यांचे चार हजार ९७१ हेक्टरवरील बागायती आणि फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यांतील १११ गावांतील शेतकरी या संकटाने बेजार झाले आहेत.

जिल्ह्यात मे २०२५ पासून सतत पाऊस सुरू आहे. जूनमध्ये अखंडित १५ दिवस पाऊस चालू झाल्यामुळे खरीप पेरण्या करण्यातही अडचणी आल्या होत्या. तरीही उघडीप मिळालेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू केला. म्हणूनच कृष्णा आणि वारणा नद्यांना मागील आठवड्यात पूर आला. 

पुराचे पाणी जवळपास आठ ते दहा दिवस पिकात थांबले होते. यातूनच भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील पलूस, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यांतील ११ हजार ७५७ शेतकऱ्यांचे चार हजार ९७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागांकडून सध्या चालू आहेत.

तालुकानिहाय पिकांचे नुकसान

तालुका / बाधित शेतकरी / गावे / क्षेत्र (हेक्टरमध्ये)
मिरज - २९०० / २२ / १९६२.९
वाळवा - ३६३५ / ३९ / १२७९
शिराळा - २३२२ / २८ / ५७०
पलूस - २९०० / २२ / ११६०
एकूण - ११७५७ / १११ / ४९७१

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. ऊस, सोयाबीन, भात, द्राक्षे आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिके घेतली होती, पण पुराने सर्व आशा पाण्यात बुडवल्या. ‘सर्व काही वाहून गेले, आता पुढे काय करायचे?’ अशी हताश भावना शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे.

प्रशासनाकडून पंचनाम्यांना वेग

जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची गरज आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासन आणि समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांचा लढा कायम

निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले, तरी त्यांचा लढण्याचा आत्मविश्वास अजूनही कायम आहे. आता सरकारकडून तातडीची मदत आणि योग्य भरपाई मिळावी, अशी अपेक्षा सांगलीतील शेतकरी व्यक्त करत आहेत.

Web Title: Heavy rains floods hit crops on 4971 hectares in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.