सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होण्यावर शिक्कामोर्तब, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:02 IST2026-02-12T18:01:21+5:302026-02-12T18:02:03+5:30
मदत करणाऱ्यांना निधीत झुकतेमाप, दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा

सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होण्यावर शिक्कामोर्तब, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा
सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेच्या नेत्यांच्या भेटी झाल्या आहेत. त्या आधारेच दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होईल, असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नूतन सदस्यांचा सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, राज्यात नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर १५९ ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष झाले. २९ महापालिकेपैकी २६ ठिकाणी महायुतीचे महापौर झाले. त्यात २१ भाजपचे महापौर आहेत. आता १२ जिल्हा परिषदेपैकी ७ ठिकाणी भाजपचे अध्यक्ष होणार आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गतवेळेच्या २५ पैकी १६ सदस्य निवडून आले. संख्या कमी आली तरी भाजपची मते वाढली आहेत.
१८ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला दोन लाखावर तर भाजपला चार लाखापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. पण, निवडणुकीत हार-जीत महत्त्वाची असते. सध्या भाजपचे १६, राष्ट्रवादी (अजित पवार) ६, शिंदेसेना ७, रयत क्रांती व जनसुराज्य प्रत्येकी १ असे ३१ संख्याबळ महायुतीकडे आहे. तर, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस व उद्धवसेनेचे मिळून ३० सदस्य आहेत. हा निकाल पाहता महायुतीचाच अध्यक्ष होईल. आता युतीचे संख्याबळ कसे वाढेल, याचा आम्ही विचार करीत आहोत.
वाचा: कडेगावात मतदारांची विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला साथ; भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळ
निकालानंतर आतापर्यंत राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेनेच्या नेत्यांच्या भेटी झाल्या. या दोन्ही पक्षांशी समन्वय करून महायुतीचा अध्यक्ष होणार आहे. यात कुठलीही शंका नाही. अध्यक्षपदाबाबत ते म्हणाले की, राजकारणात अंकापेक्षा समन्वय महत्त्वाचा असतो. २०२२ मध्ये भाजपकडे १२२ आमदार असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केेले होते. युतीतील कुठल्या पक्षाची अध्यक्षपदाची अट नाही. आम्ही समन्वय ठेवून निर्णय घेऊ. असे पत्ते ओपन केले तर मी नेता कसला? अशी मिश्किल टिप्पणीही केली.
भाजपचा अध्यक्ष होणे सोपे नाही; महायुतीचाच ठरणार!
जिल्हा परिषद निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याची कबुली देत भाजपने आत्मपरीक्षणाची भूमिका घेतली आहे. मात्र, या निकालानंतरही जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता स्थापन होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदासाठी भाजपकडे स्वतंत्रपणे आवश्यक संख्याबळ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अध्यक्षपद मिळविणे सोपे नसले, तरी महायुतीतील घटक पक्षाचाच अध्यक्ष होईल, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये अंकगणित आणि राजकीय समन्वय दोन्ही महत्त्वाचे ठरणार आहेत. भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने समीकरणे बदलली असली, तरी सत्तेच्या स्थापनेत महायुतीची आघाडी कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाचा: ..तर ठेकेदारावर कारवाई अटळ, सांगली जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त सीईओंचा इशारा
मदत करणाऱ्यांना निधीत झुकतेमाप
जिल्हा परिषद, महापालिका सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेसह अन्य घटक पक्षांनी मदत केली आहे. या पक्षांना पहिल्या टप्प्यामध्ये पदे दिली आहेत. काही घटक पक्षांना पदे देऊ शकलो नाही त्यांना निधी देण्यात झुकतेमाप देणार आहे, तसेच पुढील अडीच वर्षांसाठी शिंदेसेनेला महापालिकेत संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.