Sangli: बोगस कंपनीद्वारे १२ कोटींचा जीएसटी घोटाळा, पलूस येथील पत्त्यावर दिल्लीतील व्यापाऱ्याने फाडली चलने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:59 IST2025-10-16T11:59:33+5:302025-10-16T11:59:54+5:30
इस्लामपुरात व्यापाऱ्याच्या घरावर छापा

Sangli: बोगस कंपनीद्वारे १२ कोटींचा जीएसटी घोटाळा, पलूस येथील पत्त्यावर दिल्लीतील व्यापाऱ्याने फाडली चलने
सांगली : जीएसटी चुकवेगिरी करणाऱ्या संशयित व्यापारी, फर्म यांच्या तपासणीची मोहीम केंद्रीय जीएसटी विभागाने सुरू केली आहे. याअंतर्गत पलूसच्या पत्त्यावर दिल्लीतील एका व्यापाऱ्याने बोगस फर्म काढून बनावट चलने फाडल्याचा प्रकार जीएसटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. १२ कोटी रुपयांचा करचुकवेगिरीचा हा घोटाळा उजेडात आला आहे.
दिल्ली येथील गोविंद सिंग नामक व्यक्तीने पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील पत्त्यावर मेटल फर्मची जीएसटी नोंदणी केल्याचे व बोगस बिलांद्वारे १२ कोटींचा जीएसटी घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस बिलांसंदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर विभागाच्या अन्वेषण शाखेने रामानंदनगर येथे अचानक तपासणी केली. मात्र, प्रत्यक्ष पत्त्यावर कोणतीही फर्म अस्तित्वात नसल्याचे तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
तपासात हे स्पष्ट झाले की, संबंधित फर्मने १२ कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी चलनांची निर्मिती करून ती पुढे सादर केली. त्यामुळे संशयाच्या आधारे या चलनांची तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अनेक गोष्टींची छाननी केल्यानंतर या बनावट नोंदणीमागील मुख्य सूत्रधार दिल्लीतील गोविंद सिंग असल्याची माहिती पुढे आली.
केंद्रीय जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पत्ता आणि नोंदणी तपासली असता त्याठिकाणी कोणतेही कार्यालय, कामगार किंवा व्यावसायिक हालचाल आढळून आली नाही. त्यामुळे ही फर्म फक्त कागदोपत्री अस्तित्वात ठेवून बनावट चलने तयार करण्यात आली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इस्लामपुरात व्यापाऱ्याच्या घरावर छापा
इस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या लाल चौक परिसरातील बाजारपेठेतील एका पिढीजात तंबाखू व्यापाऱ्याच्या घरावर बुधवारी दुपारी केंद्रीय गुप्तचर महासंचालनालय, कोल्हापूर शाखेचे अधिकारी (डीजीजीआय) पथकाने छापा टाकला. तब्बल तीन ते चार तास तपासणी सुरू होती. या छापेमारीत पथकाच्या हाती काय लागले याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, व्यापाऱ्याच्या घरातील व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
इस्लामपूरच्या कारवाईबाबत गोपनीयता
इस्लामपूर येथे अधिकाऱ्यांचे पथक दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरात आले होते. या पथकाने त्यांना मिळालेल्या माहितीवरून लाल चौक परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगली होती. त्यामुळे त्याची कुणकुण कोणालाच लागली नाही. पथकाने इस्लामपुरातील संबंधित व्यापाऱ्याच्या पुणे, कोल्हापूर, सांगली परिसरातील व्यापाराची उलाढाल, स्थावर आणि जंगम मालमत्ता, रोकड आणि इतर व्यवहार या अनुषंगाने माहिती घेत घरातील कागदपत्रांची छाननी करून ती सील करीत ताब्यात घेतली. ही कारवाई तीन ते चार तास सुरू होती.
पोलिसांनी केली खात्री..!
इस्लामपूर शहरातील व्यापाऱ्याच्या घरावर छापा पडल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे छापा टाकण्यासाठी आलेल्या जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे करून खात्री केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. कवठेमहांकाळ येथे तोतयेगिरी करून एका टोळीने डॉक्टर कुटुंबाला दिवसाढवळ्या लुबाडल्याची घटना ताजी असल्याने पोलिसांनी ही खबरदारी घेतली होती.