सांगलीतील शासकीय कंत्राटदाराच्या खूनाचे गूढ कायम, तीन संयुक्त पथकाद्वारे तपास; आज उलगडा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:35 IST2022-08-19T14:35:10+5:302022-08-19T14:35:36+5:30
हात बांधलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह कवठेपिरानजवळ वारणा नदीपात्रात आढळून आला होता

सांगलीतील शासकीय कंत्राटदाराच्या खूनाचे गूढ कायम, तीन संयुक्त पथकाद्वारे तपास; आज उलगडा होण्याची शक्यता
सांगली : तुंग (ता. मिरज) येथून अपहरण करून, वारणा नदीत मृतदेह आढळलेल्या शासकीय कंत्राटदार माणिकराव पाटील यांच्या खुनाचे तिसऱ्या दिवशीही गूढ कायम होते. बुधवारी कवठेपिरान येथे वारणापात्रातून हात बांधलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला असून, आज, शुक्रवारी याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
मूळचे गोटखिंडी मात्र, सध्या सांगलीतील राममंदिर परिसरात राहण्यात असलेले माणिकराव पाटील शासकीय कंत्राटदार होते. शनिवार, दि. १३ ऑगस्टला कामानिमित्त तुंग येथे गेले होते. तेथून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी हात बांधलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह कवठेपिरानजवळ वारणा नदीपात्रात आढळून आला होता. हात बांधलेले असल्याने त्यांचा खून करून मृतदेह नदीत टाकण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त करत त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
कोणाशीही वाद नसलेल्या पाटील यांचा खून कोणत्या कारणासाठी होऊ शकतो यासाठी पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. ज्यादिवशी त्यांचे अपहरण करण्यात आले त्या शनिवारचे त्यांचे झालेले कॉल्ससह संपूर्ण आठवडाभरातील माहिती घेतली जात आहे. यासह तुंग येथे ज्याठिकाणी ते गेले होते त्या भागातील काही ग्रामस्थांचीही चौकशी पोलिसांनी केल्याचे समजते. मात्र, यातून ठोस काहीच हाती लागले नाही.
सांगली ग्रामीण पोलिसांसह विश्रामबाग पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक अशा तीन पथकांद्वारे याचा तपास सुरू आहे. दरम्यान, सर्व बाजूंनी या खून प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच उलगडा होईल, असे सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.
आज उलगडा शक्य?
पोलिसांनी तपास सुरू करताना तांत्रिक तपासावरच भर दिला आहे. सीसीटीव्हीचे फुटेज, माणिकराव पाटील यांचे कॉल्स डिटेल्स आणि इतरही तांत्रिक माहिती संकलित केली आहे. कुटुंबीय दु:खात असल्याने त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात आली नाही. तरीही आज, शुक्रवारी या खून प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.