सांगली जिल्हा बँक कर्मचारी भरतीस शासनाची परवानगी, किती पदे भरणार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:08 IST2025-10-08T19:07:54+5:302025-10-08T19:08:17+5:30
शासनमान्य कंपनीकडून भरणार

सांगली जिल्हा बँक कर्मचारी भरतीस शासनाची परवानगी, किती पदे भरणार.. जाणून घ्या
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्य शासनाने नोकरभरतीस परवानगी दिली आहे. बँकेत एकूण ५०८ पदे भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या कंपनीकडूनच पार पडणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल; यामध्ये कोणताही फसवणूक होऊ नये, असा आग्रह अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला.
मानसिंगराव नाईक यांनी सांगितले की, राज्यातील सात ते आठ जिल्हा बँकांना नोकरभरतीस परवानगी मिळालेली आहे, त्यात सांगली जिल्हा बँकाही समाविष्ट आहे. या भरतीमध्ये ४४४ लिपीक आणि ६३ शिपाई पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी शासनाने सहा कंपन्यांचा पॅनेल तयार केला आहे. जिल्हा बँकेने या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती मागवली आहे.
संचालक मंडळाने अशा कंपनीची निवड केली आहे, ज्यांच्याविरोधात पूर्वीच्या भरती प्रक्रियेबाबत कोणतेही आरोप नाहीत आणि ज्यांची काळी यादीतही नावे नाहीत. काही लोकांकडून भरतीसंदर्भात आरोपही होऊ लागले आहेत, मात्र भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेनुसारच पार पडणार असल्याचे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
ते म्हणाले की, युवकांनी कोणत्याही भ्रपशाने बळी पडू नये आणि परीक्षेसाठी योग्य प्रकारे अभ्यास करावा. सध्या बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय ४०० कर्मचाऱ्यांना वाढीव पदोन्नती देण्यात येणार असून, त्यानंतर नवीन भरती प्रक्रिया सुरू होईल. मागील साडेतीन वर्षांपासून जिल्हा बँक संचालक मंडळाचा कारभार पारदर्शक असून, नियमांचे काटेकोर पालन झाल्यामुळेच राज्य शासनाने नोकरभरतीस परवानगी दिली आहे.
नियमानुसारच भरती होणार
जिल्हा बँकेत होणाऱ्या नोकरभरती पूर्णपणे नियम आणि प्रक्रियेनुसार होणार आहे. या भरतीमध्ये कोणत्याही युवकाला अन्याय होणार नाही आणि शासनाने मान्यता दिलेल्या कंपनीकडूनच भरतीची सर्व प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे नोकरभरतीमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही, अशी खात्री मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केली आहे.