Sangli: पतीचा ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप; गोंधळेवाडीच्या सरपंच बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:23 IST2025-05-21T17:21:29+5:302025-05-21T17:23:46+5:30
विभागीय आयुक्तांची कारवाई : शासकीय मालमत्तेचे नुकसान

Sangli: पतीचा ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप; गोंधळेवाडीच्या सरपंच बडतर्फ
सांगली : गोंधळेवाडी (ता. जत) येथील सरपंच लायव्वा सुभाष करांडे यांनी ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ चे उल्लंघन करुन कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सरपंच करांडे यांच्यावर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बडतर्फीची कारवाई केली.
गोंधळेवाडीचे उपसरपंच संजय दोरकर यांनी सार्वजनिक पाण्याची टाकी पाडल्याबाबतची तक्रार दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा परिषदेकडे दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी केली होती. प्राथमिक चौकशीत जबाबदार सरपंच गोंधळवाडी यांच्याकडून कर्तव्य पार पाडण्यात दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले होते. त्यानुसार त्यांच्या विरुद्ध कलम ३९ (१) अन्वये कारवाईसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे पूर्वपरवानगी मागण्यासाठी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अहवाल पाठवला होता.
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषदेत सुनावणी घेऊन पुढील कार्यवाहीसाठी अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करून बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक मंजूर करून पाण्याचा हौद पाडण्याची गरज होती. मासिक सभेमध्ये ठराव करण्याची गरज होती. पण, सरपंच लायव्वा करांडे यांचे पती सुभाष करांडे यांनी ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर पाण्याची टाकी पाडून ग्रामपंचायतीचे नुकसान केले.
सरपंच व त्यांचे पती यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहे. यावरून सरपंच करांडे यांच्या पतीचा ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप असल्याचे आढळून आले. सरपंच करांडे यांनी सरपंच पदाचे कर्तव्य पार पाडण्यात कसूर, हलगर्जीपणा व कर्तव्यपालनात हेळसांड झाल्याचे दिसून आल्याने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायत सरपंच पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली.
सरपंच पतीचा हस्तक्षेप
ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करून बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक मंजुरी घेऊन निर्लेखन अहवाल व त्या वास्तूची किंमत निश्चित करून घेणे आवश्यक होते. त्यानंतर पुन्हा मासिक सभेमध्ये ठराव करुन सदरची वास्तू पाडणे आवश्यक होते. या कायदेशीर बाबीकडे दुर्लक्ष करुन सरपंच करांडे यांचे पती सुभाष करांडे यांनी पाण्याची टाकी पाडून ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणी प्रशासनाने सरपंच व त्यांचे पती यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.