सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त, एक लाखांचा माल हस्तगत
By शरद जाधव | Updated: October 11, 2023 18:20 IST2023-10-11T18:20:29+5:302023-10-11T18:20:48+5:30
सांगली : शहरातील स्फूर्ती चौक परिसरात पोलिसांनी लावलेल्या नाकेबंदीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले. वैभव राजाराम ...

सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त, एक लाखांचा माल हस्तगत
सांगली : शहरातील स्फूर्ती चौक परिसरात पोलिसांनी लावलेल्या नाकेबंदीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गावठी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले. वैभव राजाराम आवळे (वय २५, रा. हाडको कॉलनी, मिरज) आणि अमोल अशोक घोरपडे (३४, रा. धनगर गल्ली, मणेराजूरी ता. तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या पिस्तुलसह दुचाकी आणि जिवंत काडतुसे असा एक लाख ८०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने मंगळवारी नाकाबंदी लावली होती. स्फूर्ती चौक परिसरात पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असतानाच, मोपेडवरून संशयित आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. अंगझडती आणि वाहनाच्या तपासणीत त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल, एक मॅग्झीन आणि एक जिवंत काडतुस मिळाले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर मारामारी, घरफोडी, चोरी, दरोड्यासारखे गुन्हे दाखल आहेत. यातील वैभव आवळे याला सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही तो शहरात वावरत होता.
पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अफरोज पठाण, अनिल ऐनापुरे, संदीप साळुंखे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.