Sangli: गुंड बाळू भोकरेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक, कंत्राटदाराला ठार मारण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:48 IST2025-07-28T19:48:14+5:302025-07-28T19:48:27+5:30
गुन्हा दाखल होताच चार तासात कारवाई

Sangli: गुंड बाळू भोकरेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक, कंत्राटदाराला ठार मारण्याची दिली धमकी
सांगली : कंत्राटदाराला पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या गुंड महेंद्र ऊर्फ बाळू वसंत भोकरे (वय ५०, रा. भोईराज सोसायटी, गणेशनगर) याला सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच चार तासांत अटक केली.
गणेशनगर येथील रामभाऊ भिडे जलतरण केंद्राजवळ वॉकिंग ट्रॅकचे काम सुरू आहे. कंत्राटदार अजय सदाशिव लोखंडे हे दि. २५ रोजी सव्वा चार वाजता कामाच्या ठिकाणी असताना गुंड बाळू भोकरे हा दोन साथीदारांना घेऊन तेथे आला. कामगाराकडे बघून ‘हे काम कोणाचे आहे, येथे काम करायचे नाही’ असे म्हणून कामगार रामलखन पासवान याला मारण्यासाठी अंगावर धावून गेला.
लोखंडे हे पुढे गेल्यानंतर भोकरे याने एडक्यासारखे हत्यार दाखवून ‘काम बंद कर नाहीतर जेसीबी, ट्रॅक्टर फोडून टाकतो. तुम्हाला काम करायचे असेल पाच लाखाची खंडणी दे. खंडणी दिली नाहीतर काम करायचे नाही. परत काम चालू केल्यास तुम्हाला ठार मारतो’ अशी धमकी दिली.
लोखंडे यांनी शनिवारी रात्री सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भोकरेसह दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांना सूचना दिल्या. त्यानुसार पथक भोकरेचा माग काढत असताना गणेशनगर येथे आल्याची माहिती मिळाली. त्याला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पकडले.
पोलिस कर्मचारी संदीप पाटील, विनायक शिंदे, सतीश लिबंळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, दिग्विजय साळुंखे, योगेश सटाले, विशाल कोळी, संदीप कोळी, योगेश हाक्के यांच्या पथकाने कारवाई केली. अटक केलेल्या भोकरे याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
भोकरेवर दोन वर्षांपूर्वी हद्दपारी
बाळू भोकरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट, जीवे मारण्याची धमकी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी भोकरे याच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.