सांगलीत पैशाच्या वादातून गुंड छोट्या बाबरवर कोयत्याने हल्ला, पाचजणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:04 IST2025-09-22T14:03:49+5:302025-09-22T14:04:08+5:30
परस्परविरोधी फिर्याद दाखल

सांगलीत पैशाच्या वादातून गुंड छोट्या बाबरवर कोयत्याने हल्ला, पाचजणांवर गुन्हा
सांगली : उसने घेतलेले पैसे परतफेड करण्याच्या वादातून गुंड छोट्या ऊर्फ विक्रांत शंकर बाबर (वय ४९, रा. सुतार प्लॉट) याच्यावर कोयत्याने व चाकूने हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला.
याबाबत बाबर याची भाची, निलंबित पोलिस कोमल रामचंद्र धुमाळ, वैशाली रामचंद्र धुमाळ, अमित रामचंद्र धुमाळ, ओंकार महेश लोहार, सौरभ दिलीप सादरे (रा. सुतार प्लॉट, सांगली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तर एका महिलेस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी संशयित छोट्या बाबर आणि पत्नी रेखा यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी सायंकाळी छोट्या बाबर आणि पत्नी घरी असताना त्याची भाची कोमल धुमाळ, वैशाली धुमाळ, अमित धुमाळ, ओंकार लोहार व सौरभ सादरे घरासमोर आले. कोमलकडून उसने घेतलेले पैसे मागितले. बाबरने पैसे परत दिले असल्याचे सांगितले. त्यावरून वादावादी सुरू झाली.
तेव्हा कोमलने काठीने बाबरची पत्नी रेखा हिच्या डोळ्यावर मारले, तर अमित धुमाळ व ओंकार लोहारने कोयत्याने डोक्यावर मारले. सौरभ याने चाकूने हातावर मारून जखमी केले. वैशालीने बाबरच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले, अशी फिर्याद बाबरने दिली आहे.
दरम्यान, छोट्या बाबर आणि त्याच्या पत्नीविरुद्ध महिलेस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका इमारतीच्या जिन्यावर संशयित छोट्या बाबर चार मित्रांना घेऊन बोलत उभा होता. पीडित महिलेने त्यांना तुम्ही येथे थांबू नका, असे सुनावले. त्यामुळे छोट्या बाबरला राग आला.
त्याने मित्र विनायक येडके याला पीडित महिलेच्या अंगावर ढकलून दिले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तिने जाब विचारताच बाबर पती(पत्नीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुझ्या भावाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.