मोटारीची काच फोडून चोऱ्या करणारी टोळी दाखल, ‘कार सेफ्टी हॅमर’चा होतोय गैरवापर
By घनशाम नवाथे | Updated: September 15, 2025 17:42 IST2025-09-15T17:41:54+5:302025-09-15T17:42:28+5:30
सांगलीत भरदिवसा तीन चोऱ्या

संग्रहित छाया
घनशाम नवाथे
सांगली : भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर लावलेल्या मोटारीची काच कोणताही आवाज न येता सहजपणे फोडून आतील मुद्देमाल लंपास करणारी टोळी सांगलीत दाखल झाली आहे. शनिवारी भरदुपारी तीन मोटारींच्या काचा फोडून बेमालूमपणे आतील लॅपटॉप व साहित्य असा ६० हजाराहून अधिक रकमेचा मुद्देमाल लंपास केला. सांगलीत काही महिन्यांपूर्वी राम मंदिर परिसरात अशाप्रकारे चोऱ्या झाल्या होत्या. यासाठी ‘कार सेफ्टी हॅमर’चा चोरीसाठी वापर केला जात असल्याचे दिसून येते.
मोटारीतून प्रवास करताना सुरक्षेसाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘कार सेफ्टी हॅमर’ आहे. साधारणपणे वीतभर लांबीच्या या हातोड्याचा वापर संकटकाळात केला जातो. जर मोटार अपघाताने पाण्यात बुडाली तर लॉक काढणे अवघड जाते. अशावेळी या ‘हॅमर’ने दरवाजाच्या काचेच्या खिडकीवर दाब दिल्यास काचेला तडा जाऊन ती सहजपणे तुटते. परंतु, तेच जर आपण दुसऱ्या कोणत्याही वस्तूने काच तोडण्याचा प्रयत्न केल्यास सहज शक्य होत नाही.
तसेच मोटारीची चावी हरवली आणि आतमध्ये कोणी अडकले तर या ‘हॅमर’ने काच तोडून बाहेर पडता येते. अपघातानंतर मोटारीचे लॉक निघत नसेल तर ‘हॅमर’चा वापर करून काच तोडता येते. या हॅमरला सीटबेल्ट कापण्यासाठी ‘कटर’ देखील असतो.
कार सेफ्टी हॅमरचा क्वचितप्रसंगी वापर करण्याची वेळ येते. बहुतांश मोटार मालकांकडे ही हातोडी नसते. परंतु, अलीकडे चोरट्यांकडे मात्र हा खिशात बसणारा हातोडा असतो. ऑनलाईन अवघ्या ३०० रुपयांत तो मागवता येतो. अलीकडे मोटारीच्या दरवाजाची काच तोडण्यासाठी याचा वापर होतो. त्यामुळे भररस्त्यावर लावलेल्या मोटारीची काच कोणताही आवाज न येता सहजपणे हा हातोड्याने तोडता येते. या हातोड्याने काचेवर दाब दिल्यानंतर ती पूर्णपणे तडकते. त्यानंतर काचेला ढकलल्यानंतर मध्यभागी पोकळी निर्माण होते. त्यातून हात घालून मोटारीत सीटवर ठेवलेली बॅग, लॅपटॉप किंवा अन्य वस्तू चोरटे सहजपणे चोरतात.
सांगलीत राम मंदिर परिसरात काही महिन्यांपूर्वी दोन मोटारींच्या काचा फोडून ऐवज लंपास केल्याचा प्रकार घडला होता. त्यापूर्वीही काच फोडून मुद्देमाल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी भरदुपारी विश्रामबाग हद्दीत एकेठिकाणी आणि शहर पोलिस ठाणे हद्दीत दोन मोटारींची काच फोडून आतील लॅपटॉप, इतर साहित्य चोरून नेल्याचा प्रकार घडला. भरदुपारी रहदारीच्या रस्त्यावरील तीन मोटारींची काच फोडल्यानंतर कोणालाही माहिती न होता, चोरटे मुद्देमालासह पसार झाले.
ॲपवरून ऑनलाईन खरेदी
ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या बहुतांश ॲपवर कार सेफ्टी हॅमर २५० ते ३०० रुपयांना मिळतो. या हातोड्याचा वापर चोरटे मोटारीची काच फोडून चोरी करण्यासाठी करत असल्याचे दिसून येते.
परप्रांतीय टोळीची शक्यता
मोटारीची काच फोडून चोरी करणारी टोळी परप्रांतीय असल्याची शक्यता वर्तविली जाते. पार्किंग केलेल्या मोटारीची टेहाळणी करून आतमध्ये सीटवर बॅग, वस्तू असल्याची खात्री केली जाते. त्यानंतर पलीकडील बाजूला जाऊन काचेवर हातोड्याने दाब दिला जातो. काच तडकली की, आतमध्ये ढकलून हात घालून चोरी केली जाते.