खासगी कंपनीचे साडेअकरा लाख लुटणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 15:36 IST2020-06-03T15:30:57+5:302020-06-03T15:36:08+5:30
आटपाडी येथे आठ महिन्यांपूर्वी खासगी कंपनीची साडेअकरा लाख रुपयांची रोकड लूटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, चोरट्याकडून सहा लाख २० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

खासगी कंपनीचे साडेअकरा लाख लुटणाऱ्या टोळीला अटक
सांगली : आटपाडी येथे आठ महिन्यांपूर्वी खासगी कंपनीची साडेअकरा लाख रुपयांची रोकड लूटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, चोरट्याकडून सहा लाख २० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
धनराज ऊर्फ सोन्या सतीश पाटील (वय २५, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, सांगली), रोहित शशिकांत भगत (१९, रा. बिसूर, ता. मिरज) व लक्ष्मण मारुती सिंदगी (२३, रा. साखर कारखाना वसाहत, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
आटपाडी परिसरातील फ्लिपकार्ट, एलआयसी, इंस्टाकार्ट, डिलिव्हरी कंपनी व ईको एक्स्प्रेस कंपनीची रोकड जमा करण्याचे काम मोहन सुखदेव शिंदे (३४) हे करीत होते. ७ आॅक्टोबर २०१९ रोजी दुपारी एकच्यासुमारास शिंदे हे चार कंपन्यांकडील ११ लाख ६२ हजार ३१ रुपयांची रोकड घेऊन करगणी बँकेकडे निघाले होते. यावेळी वाटेत दोन मोटारसायकलस्वारांनी शिंदे यांना काठीने मारहाण करून त्यांच्याकडील रोकड लंपास केली होती. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जबरी चोरी, घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिदे, हेडकॉन्टेबल बिरोबा नरळे, नीलेश कदम, संदीप गुरव, सागर लवटे, संदीप नलवडे, संतोष गळवे, अनिल कोळेकर, शंकर पाटील यांचे पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करीत असताना माधवनगर रस्त्यावरील आरटीओ बसस्थानकाजवळ तिघेजण विनानंबरची मोटारसायकल घेऊन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने छापा टाकून धनराज पाटील, रोहित भगत, लक्ष्मण सिंदगी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, तिघांनी आटपाडीत साडेअकरा लाखांची रोकड चोरल्याची कबुली दिली. संशयितांकडून चार लाख दहा हजारांची रोकड, एक लाख १५ हजारांचे तीन महागडे मोबाईल, मोटारसायकल असा ६ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तब्बल आठ महिन्यांनंतर जबरी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.