Free treatment for corona patients in Sangli | सांगलीत कोरोना रुग्णांवर मोफत उपचारप्रश्नी धरणे

सांगलीत कोरोना रुग्णांवर मोफत उपचारप्रश्नी धरणे

ठळक मुद्देसांगलीत कोरोना रुग्णांवर मोफत उपचारप्रश्नी धरणेभाजयुमोचे आंदोलन : जिल्हा प्रशासन, शासनाविरोधात निदर्शने

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात यावेत, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने मंगळवारी सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले.


सांगलीतील स्टेशन चौकात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ह्यफसवी योजना जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध असोह्ण, अश घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी माने म्हणाले की, सरकार एकीकडे सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचाराची घोषणा करीत आहे, तर दुसरीकडे अनेक गोरगरिब रुग्णांना लाखोंची बिले खासगी रुग्णालयात दिली जात आहेत.

कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासूनच सर्वच स्तरातील लोकांचे अर्थकारण बिघडले आहे. लोकांचे रोजगार गेले असून शिल्लक असलेला पैसाही खर्च होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना कोणतेही वैद्यकीय बिल सोसणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरात खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ कोणालाही दिला जात नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरले आहेत. मृतदेह अडविण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्हा प्रशासनालाही आम्ही याबाबत निवेदन दिले होते.
रुग्णांवर मोफत उपचाराचे कोणतेही नियोजन सध्या खासगी रुग्णालयांमध्ये दिसत नाही. ज्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल व्हायचे आहे त्यांना ती फुल्ल असल्याने खासगी रुग्णालयांचा रस्ता दाखविला जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

लवकरात लवकर जिल्हा प्रशासन व शासनाने यात मार्ग काढून रुग्णांवर मोफत उपचार करावेत, अन्यथा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

आंदोलनात राहुल माने, संतोष रुपनर, पिंटू माने, राजू जाधव, अमित भोसले, प्रथमेश वैद्य, शुभम माने, ज्योती कांबळे, चेतन माडगुळकर, प्रवीण कुलकर्णी, सगार खंडागळे, ऋषी माने, राजू माने, जगन्नाथ साळुंखे, प्रतीक पाटील आदी सहभागी झाले होते.

Web Title: Free treatment for corona patients in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.